AC कूलिंगच्या मुद्यावरून वाद पेटला, त्याने सरळ वडिलांवर गोळ्या झाडल्या
एअर कंडीशनरचे कूलिंग होत नसल्याच्या मुद्यावरून वडील आणि मुलादरम्यान भांडण झाले. मात्र हळूहळू त्याचे मोठ्या वादात रुपांतर झाले. तो वाद इतका टोकाला गेला की मुलाने सरळ वडिलांवर रायफल रोखली आणि...
चंदीगड : पावसाळ्याचा ऋतू आला तरी सर्वत्र काही पावसाचे हवे तेवढे आगमन झालेले नाही, उलट थोड्या-थोडक्या पावसामुळे वातावरणातील गरमी अजूनच वाढत्ये. ही गरमी फक्त शरीराला नव्हे तर मनालाही त्रास देत , वैताग आणते. पण या वाढत्या गरमीचा विपरीतच परिणाम झाल्याचे पंजाबमध्ये दिसून आले. गरमीवर उतारा म्हणून पंखा, कूलर, एसी (AC) वापरला जातो, जेणेकरून थंड (cooling) वाटावे.
पण पंजाबमध्ये एसी मुळे वातावरण गार होण्याऐवजी अजूनचं तापलं. कसं ते कळल नाही ? इथे एसीच्या कूलिंग मुद्यावरून वडील आणि मुलादरम्यान भांडण झाले आणि त्याचे पर्यवसन एका भयंकर घटनेत झाले की सर्वांनाच धक्का बसला.
खरंतर होशियारपूर जिल्ह्यात AC च्या कूलिंगच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर मुलाने स्वत:च्याच वडिलांवर बंदूक ताणत त्यांच्यावर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ती गोळी त्या वृद्ध इसमाच्या पायांवर लागली , त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील जलालचक्क गावात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. तेथे वीर सिंह हे वृद्ध इसम त्यांच्या मुलासह राहतात. घरात लावलेला एसी नीट काम करत नव्हता, त्याचे कूलिंगही नीट होत नव्हते. हेच वीर सिंह यांनी त्यांच्या मुलाला सांगितले आणि एसी दुरुस्त करून घेण्यास सांगितले. मात्र साध्या मुद्याचे वादात रुपांतर कधी झाले कळलेच नाही. रागाच्या भरात त्यांच्या मुलाने त्यांच्यावर गोळी चालवली , जी त्यांच्या पायाला लागली. त्याना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारांनंतर त्यांना अमृतसरमधील रुग्णालयात हलवण्यात आले.
मी त्याचा बाप आहे, त्याने केलेली चूक मी पुन्हा करणार नाही…
सध्या अमृतसरमधील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वीर सिंह यांनी सांगितले की ‘ हा प्रकार घडला तेव्हा माझा मुलगा नशेत होता. त्याने रागाच्या भरात बंदूक उचलून माझ्यावर गोळी झाडली. जी माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये लागली. त्याने नशेत ही चूक केली होती. पण मी त्याचा बाप आहे, त्या नात्याने मी त्याच्या अटकेची मागणी करण्याची चूक करणार नाही. माझ्या मुलाला सोडून द्यावे, अशी विनंती मी पोलिसांना करतो ‘, असे त्यांनी नमूद केले.
याप्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पायाच्या मध्ये गोळी लागल्याने यावेळी वृद्ध जखमी अवस्थेत आढळून आला.जखमी व्यक्तीने जबाब देण्यास नकार दिला आहे. त्यांनी तक्रार दाखल केल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी नमूद केले.