रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पोलिसांचं टेन्शन वाढवलं, पोलीसांनी चौकशीसाठी बोलावलं पण आता त्यांचीच चौकशी होणार ?
दीपक दिवे हा युवक अगोदरच सापडत नसताना त्याच्या घरच्यांनी तक्रार दिली होती. त्यातच आज विजू जाधव याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे.
नाशिक : नाशिक पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे. नाशिक मधील गंगापूर पोलीस स्टेशन जवळ आज सकाळी ही घटना घडली असून, या युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे. विजू जाधव असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीला कंटाळून या युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईक आक्रमक झाल्याने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान बुधवारी दुपारी अडीच वाजता विजू जाधव, दीपक दिवे आणि आणखी दोघे जण मिळून नाशिकमधील गोदा पार्क येथे दारू पिण्यासाठी बसले होते. त्याचवेळी दीपक दिवे याला कुणाचा तरी फोन आल्याने तो फोन वर बोलत निघून गेला. दुसऱ्या दिवशी दीपक दिवे हा सापडत नसल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
याच्या तपासासाठी पोलिसांनी आत्महत्या केलेला युवक विजू जाधव आणि त्याच्या मित्रांना चौकशीसाठी बोलावले होते.
मात्र पोलिसांनी चौकशी करताना मारहाण केली आणि त्याच दबावामुळे आज सकाळी विजू जाधव याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
एकूणच दीपक दिवे हा युवक अगोदरच सापडत नसताना त्याच्या घरच्यांनी तक्रार दिली होती. त्यातच आज विजू जाधव याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे.
या घटनेत विजू जाधव याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केल्याने आता या घटनेची निष्पक्ष चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेपत्ता प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलाविण्यात आलेल्या युवकानं पोलिसांत जाण्यापूर्वीच विषप्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मृताच्या नातेवाइकांनी पोलिसांच्या चौकशीमुळे आणि मारहाणीमुळे आत्महत्त्या केल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे युवक पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आलाच नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे.