गुन्हा करणारे फरार झाले अन् निष्पापाचा बळी गेला, पोलीस चौकशीनंतर तरुणाची प्रकृती बिघडली मग…
नागपुरमधील कन्हान पोलीस ठाण्याअंतर्गत 3 फेब्रुवारी रोजी दुकानांची तोडफोड करत तलवारी उगारुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता.
नागपूर / सुनील ढगे (प्रतिनिधी) : आरोपी भावांबाबत चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलेल्या तरुणाची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान 17 फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला. चौकशीदरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. राहुल पंचम सलामे मयत तरुणाचे नाव आहे. नातेवाईकांनी न्याय मिळण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. नागरिक पाोलीस ठाण्यासमोर गोळा झाल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले.
3 फेब्रुवारी रोजी आरोपींनी केला होता दहशत माजवण्याचा प्रयत्न
नागपुरमधील कन्हान पोलीस ठाण्याअंतर्गत 3 फेब्रुवारी रोजी दुकानांची तोडफोड करत तलवारी उगारुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या 12 आरोपींमध्ये खैलेश पंचम सलामे आणि शुभम पंचम सलामे या दोन आरोपींचाही समावेश होता. दोघेही सख्खे भाऊ आहेत.
आरोपींच्या माहिती घेण्यासाठी पोलिसांनी भावाला घेतले होते ताब्यात
सर्व आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान खैलेश सलामे आणि शुभम सलामे या दोघांची माहिती विचारण्यासाठी पोलिसांनी त्यांचा तिसरा भाऊ राहुल पंचमेला 3 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ताब्यात घेत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. यानंतर 4 फेब्रुवारी रोजी त्याची प्रकृती बिघडली.
चौकशीनंतर तरुणाची प्रकृती बिघडली, मग उपचारादरम्यान मृत्यू
प्रकृती बिघडल्याने राहुलला नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने 12 फेब्रुवारी रोजी त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी पुन्हा त्याची प्रकृती खराब झाल्याने पुन्हा मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र 17 फेब्रुवारी रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी चौकशीदरम्यान केलेल्या मारहाणीमुळे राहुलचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या मांडला. मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईक शांत झाले. रविवारी राहुलचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.