घरातून दुर्गंधी येत होती, शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले; दरवाजा उघडून पाहिले तर…
गावातील तरुणांना एका घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी तात्काळ घरमालक आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहिले असता सर्वांना धक्काच बसला.
बागेश्वर : उत्तर प्रदेशातील बागेश्वरमध्ये एक धक्कादायक घटनेने खळबळ माजली आहे. बागेश्वरमधील घिरौली गावात एका घरात तीन मुलांसह महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती गुरुवारी रात्री पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दरवाजा तोडून पाहिले असता घरात चार मृतदेह पडले होते. आई आणि तीन मुलांचे मृतदेह घरात पडले होते तर वडिल गायब आहेत. पोलीस वडिलांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर ही हत्या आहे की आत्महत्या हे उघड होईल.
होळीच्या दिवशी शेवटचे गावकऱ्यांना दिसले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही मृतदेहांची स्थिती अत्यंत बिकट आहे. मृतदेहांना प्रचंड दुर्गंधी येत असून, यावरून मृतदेह अनेक दिवस जुने असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलीस गावकऱ्यांची चौकशी करत आहेत. हे घर गावापासून दूर असल्याने घटना लगेच लक्षात आली नाही. स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, होळीच्या दिवशी महिला आणि लहान मुले शेवटची दिसली होती.
मृत्यूचे कारण अस्पष्ट
महिला आणि तीन मुलांचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण मानत आहेत, परंतु हत्येची शक्यताही नाकारली नाही. महिलेचा पती 10 मार्चपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी सायंकाळी घिरोली जोशीगाव येथील काही तरुणांना घरातून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी डेहराडूनमध्ये राहणारे घरमालक गोविंद बिश्त आणि पोलिसांना फोनवरून माहिती दिली. यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.