बलात्काराच्या घटनेवर लोकं भडकली, रस्त्यावर मोठा गदारोळ आणि जाळपोळ, गर्दी नियंत्रणात न आल्याने पोलिसांकडून गोळीबार
आसामच्या कछार जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली. पीडितेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
गुवाहाटी (आसाम) : महाराष्ट्रासह देशभरात बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. मुंबईत साकीनाका परिसरात घडलेल्या घटनेने तर दहा वर्षांपूर्वीच्या निर्भया हत्याकांडाची आठवण करुन दिली. या घटनांवर आळा बसावा यासाठी योग्य पावलं उचलणं जास्त आवश्यक आहे. दरम्यान आसाममधून एक भयानक घटना समोर आली आहे. आसामच्या कछार जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली. पीडितेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी स्थानिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यांनी निदर्शने देत परिसरात जाळपोळ केली.
नेमकं प्रकरण काय?
कछर जिल्ह्यातील सिलचर येथील आश्रम रोड परिसरात वास्तव्यास असलेली एक अल्पवयीन मुलगी रविवारपासून (12 सप्टेंबर) बेपत्ता होती. तिचा शोध सुरु होता. अखेर बुधवारी (15 सप्टेंबर) पीडितेचा मृतदेह सिलचरच्या मधुरा घाट येथे आढळला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पीडितेच्या या अवस्थेमागे रोनी दास नावाच्या व्यक्तीचा हात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला. रोनी दास यानेच पीडितेचं अपहरण करुन बलात्कार आणि हत्या केली, असा आरोप स्थानिकांनी केला.
स्थानिकांना संताप अनावर
पीडितेचा मृतदेह सापडल्यानंतर स्थानिकांना संताप अनावर झाला होता. त्यांनी निदर्शने देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रचंड गर्दी जमली. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. गर्दीतील काहींनी घोषणाबाजी करताना रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी जाळून टाकल्या. तसेच त्यांनी सुरक्षाकर्मींवर दगडफेक केली. आरोपी रोनी दासच्या नातेवाईकांच्या दुकानांना आग लावण्यात आली. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण गर्दी त्यांच्याही नियंत्रणाबाहेर गेली. अखेर या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार सुरु केला.
पीडितेच्या कुटुंबियांची भूमिका काय?
विशेष म्हणजे पोलिसांनी हवेत गोळीबार करण्याआधी आंदोलनकर्त्यांना विनंती केली होती. आरोपींना अटक करण्यात आल्याचं सांगितलं होतं. पण आंदोलक तरीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी अनेकांनी दुकांनांना लूटुन हात साफ करुन घेतला. गर्दीतील अनेक लोक दारुच्या नशेत होते. दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी या गदारोळाचं समर्थन केलेलं नाही. संबंधित भूमिका ही आपली भूमिका नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे.
पीडितेच्या वडिलांचे सहा जणांवर गंभीर आरोप
परिस्थितीला निंयत्रणात करण्यासाठी घटनास्थळी 147 सीआरपीएफ जवान, फायर ब्रिगेडच्या गाड्या तैनात करण्यात आल्या. तसेच डीआयजीपासून अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अथक परिश्रमानंतर अखेर परिस्थिती नियंत्रणात आली. दुसरीकडे याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीवर सहा आरोपींकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्या सहा आरोपींना मृत्यूदंड देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा :
सहा वर्षांचा लेक ठरला प्रेमात अडथळा, सख्ख्या आईकडून प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या
मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसची पुन्हा चौकशी होणार, नोरा फतेहीला देखील ईडीचा बुलावा!