Dombivali Crime : एका रात्रीत तीन बंगले चोरट्यांनी फोडले, पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या घटनेने सर्व हादरले !
डोंबिवलीत चोरट्यांनी हैदोस मांडला आहे. या चोरट्यांना कायद्याचीही भीती उरलेली नाही. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी तीन बंगले फोडल्याने खळबळ उडाली आहे.
डोंबिवली : डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील मिलाप नगरमधील तीन बंगले फोडून चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा रहिवास असलेल्या या भागात घुसून चोरट्यांनी एकाच रात्री लागोपाठ तीन बंगले लक्ष्य केले. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बंगल्यातील घर सामानाची नासधूस तर केलीच, शिवाय देवांच्या चांदीच्या मूर्तीही लांबविल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
जेष्ठ नागरिक एकटे असल्याची संधी साधत चोरी
डोंबिवली एमआयडीसी हद्दीत चोरी, लूटपाट, दहशत माजवणे, धारदार हत्यारे बाळगणे आदी गुन्हेगारींचे प्रमाण वाढले आहे. औद्योगिक विभागातील कारखान्यांत चोरीच्या घटना होत असतानाच चोरट्यांनी निवासी भागातील बंगल्यांना देखील लक्ष केले आहे. येथील निवासी भागातील बंगल्यात ज्येष्ठ नागरिक राहत असून, त्यातील बहुतांश नागरिकांची मुले ही नोकरीनिमित्त बाहेर असतात. या बंगल्यांना चोरटे हेरुन तेथे चोरी करत आहेत. सोमवारी पुन्हा या बंगल्यांना चोरांनी टार्गेट केले. यात दोन बंगल्यात चोरांना अपयश आले असून तिसऱ्या बंगल्यात हे चोर शिरून घरसामानाची नासधूस करत देवाच्या मूर्ती केल्या लंपास केल्या आहेत.
एकाच रात्रीत तीन घटनांनी डोंबिवली हादरली
मिलाप नगरमधील उष्मा पेट्रोल पंप समोर एकाच ओळीतील 3 बंगल्यांपैकी आर एल – 154/1 बंगल्याचे मालक राजीव देशपांडे हे बाहेरगावी गेले होते. रविवारी रात्री नऊ वाजता घरी परतले असता बंगल्याच्या खिडकीचे ग्रिल तोडून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात त्यांनी काही मौल्यवान वस्तू ठेवल्या नव्हत्या. मात्र चोरांनी हाती लागलेल्या चांदीच्या मूर्ती चोरून नेल्या. घरातील कपाटे तोडून त्यांची नासधूसही करण्यात आली. या बंगल्याभोवती सिक्युरिटी अलार्म सिस्टीम आणि सीसीटिव्ही कॅमेरे असतानाही चोरट्यांनी कोणताही पुरावा न ठेवता योजनाबद्ध रीतीने आखणी करून चोरी केल्याचे सांगण्यात आले.
दुसऱ्या घटनेत सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास याच बंगल्याच्या बाजूला असलेल्या RL – 153 या बंगल्यात खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी आता प्रवेश केला. मात्र सिक्युरिटी अलार्म वाजल्याने बंगल्याचे 75 वर्षीय मालक चंद्रशेखर देव जागे झाल्याने घरात शिरलेले चोरटे पळून गेले. तिसऱ्या घटनेत सोमवारी पहाटेच्या सुमारास तेथेच बाजूला असलेल्या RL – 152 बंगल्यात घडली. सदर बंगल्यात कुणीही नसताना खिडकीच्या काचा तोडून आत शिरण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. याच बंगल्यात पूर्वी अनेकदा चोऱ्या झाल्या आहेत.
या तिन्ही चोऱ्यांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बंगल्यात चोरी केल्याने मानपाडा हद्दीतील कायदा सुव्यवस्था रामभरोसे आहे काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत.