चोरट्यांची कमाल, पोलीस ठाण्यातच केला हा प्रताप; सुरक्षा रक्षकांची उडवली तारांबळ
चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरी करून सर्वांना चक्रावून टाकले आहे. पोलीस ठाण्यातील साडेआठ लाख रुपयांचा जप्तीचा गांजा चोरट्यांनी चोरून नेला.
गुजरातमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विशेषतः अंमली पदार्थांच्या तस्करीचे (Drug smuggling) प्रमाण अधिक आहे. देशभरात अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या तस्करांच्या टोळ्या गुजरातमार्गेच परदेशातून अंमली पदार्थांची ने-आण करतात. गेल्या काही महिन्यांतील कारवायांमधून हे उघड झाले आहे. आता तर अशा गुन्हेगारांनी पोलीस ठाण्यातही (Gujrat Police Station) हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला अंमली पदार्थांचा साठा गुन्हेगारांनी चोरून नेल्याने (Narcotics stolen) खळबळ उडाली आहे.
एक-दोन नव्हे तर तब्बल 144 किलोचा गांजा पोलीस ठाण्यातून चोरीला नेल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीररित्या ऐरणीवर आला आहे. चोरी करून चोरटे प्रसार कुठे झाले, याचा शोध घेताना सुरक्षारक्षकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.
साडेआठ लाखांचा गांजा लंपास
चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरी करून सर्वांना चक्रावून टाकले आहे. पोलीस ठाण्यातील साडेआठ लाख रुपयांचा जप्तीचा गांजा चोरट्यांनी चोरून नेला. आनंद जिल्ह्यातील वीरसाड पोलीस ठाण्यात ही धक्कादायक चोरीची घटना घडली आहे.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
गांजाचा मोठ्या प्रमाणावर साठा चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, चोरटे पोलिसांच्या ताब्यातील अंमली पदार्थाचा साठा चोरून नेण्याचे धाडस कसे करतात, असा सवाल स्थानिक रहिवाशांमधून विचारला जात आहे.
चोरट्यांना पोलीस यंत्रणेतील कोणाची मदत झाली आहे का, याचाही कसून तपास केला जात आहे. वीरसाड पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल शोभना वाघेला यांनी या चोरीप्रकरणी तक्रार नोंदवली आहे.
शनिवारी सकाळी त्या ड्युटीवर रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी अंमली पदार्थाचा साठा असलेला कस्टडी रूमला भेट दिली. त्यावेळी त्यांना तब्बल 144 किलोचा गांजा चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
144 गांजा चोरुन नेला
सुरुवातीला गांजाच्या साठ्यापैकी एक पिशवी गांजा अस्तव्यस्त बाजूला पडल्याचे दिसले. त्यानंतर त्यांना कस्टर्ड रुमची खिडकी तोडल्याचे आढळले. त्यावरून त्यांनी अधिक चौकशी केली असता 144 किलोचा गांजा गायब असल्याचे लक्षात आले.
चोरट्याने कस्टडी रूमच्या खिडकीतूनच पलायन केले होते. खिडकीच्या समोरील विटाही काढून टाकण्यात आल्या होत्या. शनिवारी सकाळी उघडकीस आलेल्या या चोरीचा अद्याप उलगडा न झाल्यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.