Shirdi Murder : वहिनीला गावठी कट्टा दाखवत होता दिर, चुकून ट्रिगर दाबला गेला अन् गोळी थेट महिलेच्या डोक्यातून आरपार
आरोपी विशाल भालेराव याने बाहेरून गावठी कट्टा आणला होता. हा गावठी कट्टा तो आपली वहिना सुनिता भालेराव यांना दाखवत होता. मात्र कट्टा दाखवत असतानाच आरोपीकडून ट्रिगर ओढला गेला आणि गोळी सुनिता यांच्या डोक्यात आरपार घुसली.
शिर्डी : भावजयीला गावठी कट्टा (Pistol) दाखवताना दिराकडून ट्रिगर (Trigar) दाबला गेल्याने गोळी थेट भावजयीच्या डोक्यातून आरपार झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या भावजयीला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू (Death) झाला. सुनीता भालेराव असे मयत महिलेचे नाव आहे. घटना घडल्यानंतर दिर तेथून फरार झाला. मात्र पोलिसांनी कसून तपास करत आरोपी दिराला ताब्यात घेतलं आहे. विशाल भालेराव असे आरोपी दिराचे नाव आहे.
कट्टा दाखवत असताना ट्रिगर ओढला गेला
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे आज सकाळी ही गोळीबाराची घटना घडली. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल भालेराव याने बाहेरून गावठी कट्टा आणला होता. हा गावठी कट्टा तो आपली वहिना सुनिता भालेराव यांना दाखवत होता. मात्र कट्टा दाखवत असतानाच आरोपीकडून ट्रिगर ओढला गेला आणि गोळी सुनिता यांच्या डोक्यात आरपार घुसली. घटना घडल्यानंतर आरोपी दिर घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही वेळातच आरोपीला अटक केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
आरोपीकडून चुकून गोळी सुटली की मारली अशी चर्चाही परिसरात होत आहे. आरोपीकडे अनधिकृत गावठी कट्टा आला कुठून ? आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आहे का ? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. या घटनेने कोपरगाव तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
येवल्यात गोळीबारात परदेशी नागरिकाचा मृत्यू
येवला तालुक्यातील चिचोडी एमआयडीसी येथे मंगळवारी संध्याकाळी झालेल्या वादानंतर गोळीबाराची घटना घडली. या घटनेत सध्या नाशिकमध्ये वास्तव्याला असलेल्या अफगाणिस्तान येथील नागरिकाचा मृत्यू झाला. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील आदित्य हॉटेलच्या मागे राहत असलेले सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती यांच्या डोक्याला गोळी लागली. यावेळी सोबत असलेल्या साथीदारांनी अज्ञात वाहनातून पळ काढला तर दोघे घटनास्थळी थांबून आजूबाजूच्या वस्तीवरील नागरिकांकडे मदत मागत होते. गोळीबार झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी येवला शहर पोलिसांना देताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती यांना येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट झाले नसले तरी हा गोळीबार धार्मिक कार्यातून घडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (The woman was accidentally shot while showing a pistol to her brother in law)