उत्तर प्रदेशमधील बाईकवरुन कल्याणमध्ये चोरी, पोलिसांनी ‘असा’ लावला आरोपींचा छडा
काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व भागातील विजयनगर परिसरात एका महिलेची चैन आणि दागिने हिसकावून दोन चोरटे बाईकवरुन पसार झाले होते. यावेळी ठिकठिकाणचे सीसीटीव्ही तपासत असताना दोन इसम बाईकवरून फिरताना आढळले.
कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्यात. या पार्श्वभूमीवर पोलीस सुद्धा अलर्ट झालेत. कल्याण पूर्वेत देखील एका महिलेचे दागिने लुटून (Jewellery Loot) चोर पसार झाले होते. यासंदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. यादरम्यान 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही (CCTV) पोलिसांनी तपासले आणि अखेर दोन आरोपींना अटक (Arrest) केली.
धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्हीत दिसणाऱ्या बाईकचा धागा पकडत पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. ही गाडी उत्तर प्रदेशमधून कल्याणात चोरीसाठी आणली होती.
एका चोरी प्रकरणाचा तपास करताना चोरटे जेरबंद
काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व भागातील विजयनगर परिसरात एका महिलेची चैन आणि दागिने हिसकावून दोन चोरटे बाईकवरुन पसार झाले होते. यावेळी ठिकठिकाणचे सीसीटीव्ही तपासत असताना दोन इसम बाईकवरून फिरताना आढळले. त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.
सापळा रचून नांदिवली परिसरातून चोरट्यांना घेतले ताब्यात
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. आरोपी त्याच बाईकवर कल्याण पूर्व भागातील नांदिवली परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचत या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
आरोपींकडून चार बाईकही जप्त
आदेश बनसोडे आणि अमित पाल अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. त्यांच्याकडून चार बाईकही जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेली बाईक ही उत्तर प्रदेशातील असल्याने ही बाईकही चोरीची आहे का याचा पोलीस तपास करीत आहेत.
कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी हरीदास बोचरे आणि दीनकर केदारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. एका बाईकचा धागा पकडत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.