अंबरनाथमध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ, डॉक्टरची महागडी बाईक चोरुन चोरट्यांचा पोबारा
सीसीटीव्हीमध्ये रात्री अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी ही बाईक चोरून नेल्याचं समोर आलं. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
अंबरनाथ : एका डॉक्टरची महागडी दुचाकी घराखालून चोरून नेल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी संध्याकाळी एक सोनसाखळी चोरीची घटना घडली. त्यानंतर रात्रीच डॉक्टर रणदिवे यांच्या महागड्या बाईक चोरीसोबतच वडवली परिसरात सुद्धा आणखी एक बाईक चोरल्याची घटना घडली. त्यामुळे शिवाजीनगर पोलीस रात्रीच्या वेळी नक्की गस्त घालतात का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सहा महिन्यांपूर्वीच घेतली होती अडीच लाखांची बाईक
अंबरनाथच्या शिवबसव नगरमध्ये डॉक्टर अनिरुद्ध रणदिवे आणि डॉक्टर युगंधरा रणदिवे हे डॉक्टर दाम्पत्य त्यांच्या मुलासह वास्तव्याला आहे. त्यांच्या मुलासाठी त्यांनी टीव्हीएस रॉनीन ही तब्बल अडीच लाख रुपयांची महागडी बाईक 6 महिन्यांपूर्वीच विकत घेतली होती.
रविवारी रात्री ही बाईक त्यांच्या मुलाने इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी करून ठेवली होती. मात्र सोमवारी सकाळी त्यांच्या मुलाला ही बाईक न दिसल्यामुळे त्याने सीसीटीव्ही चेक केले.
मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगमधून चोरी
सीसीटीव्हीमध्ये रात्री अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी ही बाईक चोरून नेल्याचं समोर आलं. डोक्यात टोपी आणि तोंडाला रुमाल बांधलेल्या या दोन चोरट्यांनी आधी इमारतीच्या पार्किंगमध्ये येऊन ही महागडी बाईक चोरण्याचं निश्चित केलं.
यानंतर पार्किंगमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर हात टाकत हा कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न केला. या महागड्या बाईकचं हँडल लॉक तोडून चोरटे ही बाईक काही अंतर ढकलत घेऊन गेले. मग तिथून बाईक सुरू करत बाईक घेऊन पसार झाले.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.