अनिकेत गावंड हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश, पैशाच्या वादातून मित्रानेच थेट…
बाभूळगाव नगर पंचायत नगरसेवक अनिकेत गावंडे यांची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना काल मध्यरात्री घडली. याप्रकरणी हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे.
यवतमाळ / विवेक गावंडे : बाभूळगाव तालुक्यातील मिटणापूर येथे रेती व्यवसायिक तथा प्रहार पक्षाचा नगरसेवक अनिकेत गावंडे यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. रेती व्यवसायातील भागीदार असलेल्या मित्रानेच चाकूने वार करून अनिकेत यांची निर्घृण हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी बाभूळगाव पोलीस ठाण्याने तिघांना अटक केली आहे. सड्डू उर्फ सादीकमुल्ला सलीम मुल्ला, गोलू उर्फ समीरमुल्ला सलीममुल्ला आणि सोनू उर्फ आबीदमुल्ला सलीममुल्ला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पैशांवरुन अनिकेत यांच्या भावाचा आरोपींसोबत वाद झाला
बाबूळगाव तालुक्यातील मिटणापूर येथे मृतक अनिकेत गावंडे यांचा भाऊ शुभम गावंडे हा जुने व्यवसायातील पैसे मागण्यासाठी सड्डू उर्फ सादीकमुल्ला सलीम मुल्ला, गोलू उर्फ समीरमुल्ला सलीममुल्ला आणि सोनु उर्फ आबीदमुल्ला सलीममुल्ला यांच्याकडे गेला होता. दरम्यान त्यांच्यात वाद झाल्याने शुभम गावंडे याने भाऊ अनिकते गावंडे याला बोलावले.
वादातून अनिकेत यांची हत्या
या ठिकाणी वाद विकोपाला गेल्याने नगरसेवक अनिकेत गावंडे यांच्यावर धारदार चाकूने छातीवर वार केले. या हल्ल्यात अनिकेत हे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. काल रात्री 11.30 ते 12 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे आज बाभूळगावमध्ये तणावाचे वातावरण असून, व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. रेती तस्करीतून ही हत्या झाली आहे.