राष्ट्रवादी कार्यकर्ता नालसाब मुल्ला हत्या प्रकरण, आणखी तिघांना अटक
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला याच्या हत्येप्रकरणी पोलिसांना आणखी तीन आरोपींना बेड्या ठोकण्यास यश आले आहे.
सांगली : सांगलीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला हत्या प्रकरणात आणखी आरोपींना अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. रोहित अंकुश मंडले, प्रशांत उर्फ बबलू संभाजी चव्हाण आणि ऋत्विक बुद्ध माने अशी अटक आरोपींची नावे आहेत. तिघेही अटक आरोपी घटनेवेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी मंडले यानेच टार्गेट दाखवल्याचे पोलीस तपासात उघड झाले. यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली. हत्याकांडातील मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे हा सध्या कळंबा कारागृहात आहेत. त्यालाही ताब्यात घेण्याच्या पोलिसांच्या हालचाली सुरु आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक
नालसाब मुल्ला याचे शंभर फुटी रस्त्यावर बाबा चौकात निवासस्थान आहे. मुल्ला शनिवारी सायंकाळी वाचनालयाजवळ थांबला असतानाच अंधारात दुचाकीवरून चौघेजण आले. दुचाकीस्वारांनी मुल्लावर गोळीबार केला. यावेळी मुल्लाच्या छातीवर आणि पोटावर गोळ्या झाडल्या आणि हल्लेखोर पसार झाले.
याप्रकरणी पोलिसांनी अटक आरोपी सनी कुरणे, विशाल कोळपे आणि स्वप्निल मलमे या तिघांकडे कसून चौकशी केली. यावेळी त्यांच्यासोबत आणखी तिघे सहभागी असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांच्या पथकाने रोहित मंडले, प्रशांत उर्फ बबलू चव्हाण आणि ऋत्विक माने या तिघांना अटक केली.
सांगलीत महेश नाईक हत्या प्रकरणात मोक्काअंतर्गत तुरुंगात असलेला आरोपी सचिन डोंगरेला जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने नालसाब मुल्ला याची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी 24 तासाच्या आत गुन्ह्याचा छडा लावून चौघांना अटक केली.