सोलापूरनंतर सांगलीत वारकऱ्यांवर काळाचा घाला; दिंडीत कार घुसली, तीन वारकरी जखमी
जखमी वारकऱ्यांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. हे सर्वजण मोहिते वडगाव तालुका कडेगाव येथील रहिवासी आहेत.
सांगली : सोलापूरनंतर सांगलीत वारकऱ्यांना चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या दिंडीला पाठीमागून स्विफ्ट डिझायर कारने टक्कर दिल्याने तीन वारकरी जखमी झाले आहेत. सदर घटनेच्या वेळेस समोरून येणाऱ्या मोटरसायकलला चुकवण्याच्या प्रयत्नात कारचालकाचा अंदाज चुकल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमध्ये तीन जण जखमी झाले आहेत.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
भीमराव पांडुरंग जाधव, धनाजी राजाराम मोहिते, शिवाजी मारुती मोहिते अशी जखमी वारकऱ्यांची नावे आहेत. जखमी वारकऱ्यांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. हे सर्वजण मोहिते वडगाव तालुका कडेगाव येथील रहिवासी आहेत.
अपघातग्रस्त कार सोलापूच्या दिशेने जात होती
अपघात ग्रस्त वाहन हे माहुली येथील असून सोलापूरच्या दिशेने जात होते. ड्रायव्हर भानुदास थोरात हे खटाव तालुका जिल्हा साताऱ्याचे आहेत अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
काल सांगोल्याजवळ वारकऱ्यांना चिरडले
सोलापूर-मिरज या राष्ट्रीय महामार्गावर काल सांगोल्याजवळील जुनोनीजवळ वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील सातजणांचा मृत्यू झाला. तर पाचजण गंभीर जखमी झाले. यामुळे जठारवाडी गावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
आज सकाळी शोकाकुल वातावरणात या गावातील 5 भाविकांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या दिंडीत एकूण 36 वारकरी होते.
ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुणोनी येथे रात्री जेवण आणि मुकाम करण्यासाठी थांबणार होती. मात्र त्यापूर्वीच काळाने घाला घालत मिरजेहून भरधाव वेगाने येणारी कार या दिंडीत सर्वांना चिरडत घुसली.