दूध घेण्यासाठी कुणीही दरवाजा उघडत नव्हते, मग दूधवाल्याने शेजाऱ्यांना सांगितले, शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले अन्…
नेहमीप्रमाणे दूधवाला दूध घेऊन आला, पण कुणी दरवाजा उघडला नाही. मग शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावून दरवाजा उघडला. आतले दृश्य पाहून शेजाऱ्यांना धक्काच बसला.
लुधियाना : पंजाबमध्ये ट्रिपल मर्डरच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. या घटनेमुळे जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घरात एकटे असलेल्या तीन वृद्धांची अज्ञाताने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मयतांमध्ये पती-पत्नी आणि आईचा समावेश आहे. या तिघांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी गाठून तिन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मयत जोडप्याला चार मुलं असून, सर्वजण परदेशात आहेत. चमनलाल, सुरिंदर कौर आणि बचन कौर अशी मयतांची नावे आहेत.
दूधवाला आल्यानंतर घटना उघड
नेहमीप्रमाणे सकाळी दूधवाला दूध घेऊन आला. त्याने दरवाजा ठोठावला पण कुणी दरवाजा उघडला नाही. मग त्याने शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. शेजाऱ्यांनी येऊन दरवाजा ठोठावला, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले. आत जाताच आतलं दृश्य पाहून शेजाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आतमध्ये घरातील तिन्ही वृद्धांचे मृतदेह पडले होते.
शवविच्छेदनानंतर सत्य उघड होईल
पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिवसभर तिघेही घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे तिघांची हत्या आधीच झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हत्या ओळखीच्या इसमाने केली असावी असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.