बहिणीच्या लग्नासाठी चालले होते तिघे भाऊ, मात्र बहिणीची पाठवणी करण्यासाठीच भाऊ…
घरापासून एक किमी अंतरावर हुडिल गावाजवळ त्यांच्या कारची आणि बसची टक्कर झाली. टक्कर इतकी जोरदार होती की विकास आणि सुरजितचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी जगदीशला स्थानिक नागरिकांनी तात्काळ कुकनवाली सीएचसी रुग्णालयात नेले.
नागौर : राजस्थानमधील नागौरमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. बहिणीच्या लग्नासाठी चाललेल्या तीन भावांवर वाटेतच नियतीने घाला घातल्याची धक्कादायक घटना नागौरमधील चितावा पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बस आणि कारमध्ये भीषण टक्कर झाल्याने कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिसऱ्याला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. विकास, सुरजित आणि जगदीश अशी मयत तरुणांची नावे आहेत. विशेष म्हणजे घरापासून केवळ एक किमी अंतरावर हा अपघात घडला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
तिघेही तरुण जयपुरला शिक्षण घेत होते
सुरजित आणि जगदीश विकासचे मामेभाऊ होते. तिघेही जयपूरला शिक्षण घेत होते. विकासच्या बहिणीचे लग्न होते. या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी तिघेही कारने जयपूरहून नागौर येथे येत होते.
घरापासून एक किमी अंतरावर कारला भीषण अपघात
घरापासून एक किमी अंतरावर हुडिल गावाजवळ त्यांच्या कारची आणि बसची टक्कर झाली. टक्कर इतकी जोरदार होती की विकास आणि सुरजितचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी जगदीशला स्थानिक नागरिकांनी तात्काळ कुकनवाली सीएचसी रुग्णालयात नेले.
प्राथमिक उपचार केल्यानंतर जगदीशला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र तेथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली आहे.
तीन तरुणांच्या अशा अपघाती निधनाने कुटुंबाला दुःख अनावर झाले आहे. जगदीश हा घरात एकुलता एक कमावता होता. त्याला चार बहिणी आहेत. त्यामुळे जगदीशच्या निधनामुळे कुटुंबाचा आधार हिरावला आहे.