आई-वडिलांनीच पोटच्या गोळ्याला सुपारी देऊन संपवले, नेमके कारण काय?
प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी मृतदेह पेकण्यासाठी एका कारचा वापर केल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाले.
हैदराबाद : मुलाच्या अत्याचाराला कंटाळून एका आई-वडिलांनी स्वतःच सुपारी देऊन पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेलंगणातील सूर्यापेट येथील तिरुमलागिरी येथे हे प्रकरण उघडकीस आले आहे. घटना ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. क्षत्रिय साईनाथ असे हत्या झालेल्या 26 वर्षीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आई, वडिल, काका यांच्यासह 7 जणांना अटक केली आहे. रामसिंग असे वडिलांचे आणि राणीबाई असे आईचे नाव आहे.
मुलाच्या अत्याचाराला कंटाळले होते
तेलंगणातील खम्मम येथील सत्तुपल्ली येथे रामसिंग आणि राणीबाई आपला मुलगा क्षत्रिय साईनाथ याच्यासह राहत होते. साईनाथ हा आईवडिलांचा छळ करत होता, त्यांना मारहाण करायचा. अखेर मुलाच्या वागण्याला आणि अत्याचाराला कंटाळलेल्या आईवडिलांनी त्याला मारण्याची सुपारी दिली.
8 लाखात सुपारी देऊन मारले
मुलाच्या हत्येसाठी त्यांनी 5 लोकांना 8 लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानुसार आरोपींनी गळा आवळून साईनाथची हत्या केली. हत्येनंतर मृतदहे मूसी नदीत फेकून दिला.
स्थानिक लोकांनी नदीत मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात पंचनामा केला. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला.
‘असा’ झाला हत्येचा खुलासा
प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी मृतदेह पेकण्यासाठी एका कारचा वापर केल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाले. दहा दिवसानंतर मृतदेहाची ओळख पटवत आई-वडिलांकडे मृतदेह सुपूर्द केला.
अंत्यसंस्कारानंतर जेव्हा पोलिसांनी आई-वडिलांना चौकशीसाठी बोलावले तेव्हा ते सीसीटीव्ही दिसलेल्या त्याच कारमधून आले. पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.