गुजरात बेस्ट बेकरी प्रकरण, मुंबई सत्र न्यायालयाने दिला ‘हा’ निकाल
गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिंसाचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड. या हत्याकांड प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने आज महत्वपूर्ण निकाल दिला.
मुंबई : गुजरात बेस्ट बेकरी केस प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने आज आपला महत्वपूर्ण निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींची पुराव्याअभावी न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी हा निकाल दिला. मफत मनीलाल गोहिल आणि हर्षद रावजीभाई सोलंकी अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात असून, लवकरच त्यांची सुटका होणार आहे. दोन्ही आरोपींना कोर्टाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केला आहे. मात्र सरकार कोर्टाच्या निर्णयाविरोधात अपीलमध्ये जाणार की नाही याबाबत सपष्ट नाही.
मात्र निर्दोष असून, आरोपींना 10 वर्षे तुरुंगात रहावं लागलं. याबाबत नुकसान भरपाईची मागणी करणार का? याबाबत आरोपीचे वकील अॅड. प्रकाश सालसिंगीकर यांनी कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यावर आम्ही त्याचा अवलोकन करणार त्यानंतर योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
काय आहे बेस्ट बेकरी प्रकरण?
वर्ष 2002 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथं गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिंसाचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड आहे. या घटनेत जमावानं 14 जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं. दोन्ही आरोपींसंदर्भात कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. मात्र आज या प्रकरणात निकाल देत कोर्टाने दोघांना निर्दोष मुक्त केलं आहे.
बेकरी मालकाची मुलगी झहिरा शेख हिच्या तक्रारीवरून 21 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. 2003 ला फास्ट ट्रॅक कोर्टानं सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. फिर्यादी झहिरासह अनेक साक्षीदारांना फितूर घोषित कोर्टानं केलं होतं. गुजरात हायकोर्टानंही हा निकाल कायम ठेवला होता. गुजरातमधील फास्ट ट्रॅक कोर्ट, गुजरात उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयावर मुंबई विशेष कोर्टाचं शिक्कामोर्तब केलं.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं खटल्याची नव्याने सुनावणी
सामाजिक कार्यकर्ता तिस्ता सेटलवाड यांनी सुप्रीम कोर्टात याविरोधात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं या खटल्याची नव्यानं मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला होता. त्यावर कोर्टानं आज आपला निकाल देत आज दोन्ही आरोपींना निर्दोशमुक्त केलं आहे.