Nalasopara Boys Death : साचलेल्या पाण्याने घात केला, दोन लहानग्यांचा बुडून मृत्यू, नालासोपाऱ्यात खळबळ
अजमद सिकंदर अन्सारी (वय 07) आणि जुनेद शकील मनिहार (वय 08) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. घराच्या शेजारी खेळत असताना बाजूच्या खदाणीत पोहायला गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले आहेत.
नालासोपारा : नालासोपाऱ्यात (Nalasopara)2 अल्पवयीन मुलांचा खदाणीच्या साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू (Boys Death)झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पेल्हार वनोठा पाडा येथील खदाणीत काल शनिवारी सायंकाळीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.आज सकाळी दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले आहे. अजमद सिकंदर अन्सारी (वय 07) आणि जुनेद शकील मनिहार (वय 08) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. घराच्या शेजारी खेळत असताना बाजूच्या खदाणीत पोहायला गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले (Boys Drown) आहेत. सदर घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेने या भागातील खदाणी आता किती धोकादायक आहेत हेही दाखवून दिले आहे. या भागातील या खदाणी आता पावसाळ्याच्या दिवसात चांगलीच स्थानिकांची चिंता वाढवत आहेत.
खदाणीच्या मालकावर कारवाईची मागणी
नालासोपारा पूर्व पेल्हार परिसरात अनाधिकृत चाळींचे साम्राज्य आहे. वनोठा पाडा येथे अनाधिकृत खदाणी आहेत. भूमाफियांनी अनाधिकृत खदाणी खोदून ठेवल्या आहेत. याठिकाणी कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजनाही नाही. त्यामुळे लहानमुले खेळण्यासाठी, पोहण्यासाठी खदाणीत जातात आणि अशा दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अशा अनाधिकृत खदाणी मालकावर तातडीने कारवाही करावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत. त्यामुळे आता पोलीस प्रशासन यात काय भूमिका घेते तसेच स्थानिक प्रशासन आणि नेते काय भूमिका घेतात हेही पाहण महत्वाचं ठरणार आहे. मात्र आता या घटनेने स्थानिक नागरिक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे याची दखल ही प्रशासनाला तात्काळ घ्यावीच लागणार आहे. अन्यथा स्थानिकांच्या आक्रोशालाही समोरे जावे लागू शकते.
पावसाळ्यात लहानग्यांची विशेष काळजी घेण्याचे आव्हान
पावसाळ्याच्या दिवसात विविध ठिकाणी पाणी साचलेलं असतं, आसपासच्या नद्या, नाले, ओढे, तळी, ताली, शेततरळी विहिरी, तसेच पाण्याची अनेक ठिकाणं ही तुडुंब भरलेली असतात. अशा वेळी लहान मुलांना पाण्यात खेळण्याचा आणि पोहण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे लेगच पाण्याच्या ठिकाणाकडे आकर्षित होतात. मात्र काही वेळेला लहानग्यांना पाण्याचा पूर्ण अंदाज येत नाही. त्यातून असे भयंकर प्रकार घडतात. आणि अगदी लहान वयात ते जीवाला मुकतात. त्यामुळे इतर वेळी तर लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मात्र पावसाळ्याच्या काळात लहान मुलांची अतिरिक्त काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे असे संभाव्य विपरीत प्रकार टाळणे शक्य होऊ शकते.