जेलमधून बाहेर येताच फ्लिपकार्टच्या गोडाऊनवर डल्ला; ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात
फ्लिपकार्टच्या गोडाऊनमध्ये डिलिव्हरीसाठी ठेवलेला माल रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लुटला. चोरी केल्यानंतर चोरटे विविध शहरात पसार झाले. पण एक चूक चोरट्यांना पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन आली.
कल्याण / सुनील जाधव : सूचक नाका परिसरात रात्रीच्या सुमारास फ्लिपकार्टच्या गोडाऊनचे शटर तोडून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसात चोरीची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गोडाऊनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरटे त्यात कैद झाले होते. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला. मात्र पोलिसांना आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर एका चोरट्याने गोडाऊनमधून चोरलेला एक मोबाईल कार्ड टाकून चालू केला. याच मोबाईलमध्ये चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडले. पोलिसांना दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले असून, एक जण अद्याप बेपत्ता आहे.
चोरी केल्यानंतर चोरटे विविध शहरात पसार झाले
चोरी केल्यानंतर तिन्ही चोरटे वेगवेगळ्या शहरात पसार झाले होते. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या टीमने सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तपास सुरू केला. यातील एका चोराने गोडाऊनमधून चोरलेल्या मोबाईलमधून एक मोबाईल सुरू केला. मोबाईल चालू करताच पोलिसांनी या मोबाईलचा माग काढला. हा मोबाईल जालन्यामध्ये असल्याचा निष्पन्न झालं.
पोलिसांनी तात्काळ जालना गाठून तेथून राहुल पंडित या चोरट्याला बेड्या ठोकल्या. राहुलने चौकशी दरम्यान सागर शिंदे आणि अमन खान या त्याच्या दोन साथीदारांची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ सागर शिंदे याला उल्हासनगर येथून अटक केली. या दरम्यान अमर खान मात्र पसार होण्यात यशस्वी झाला.
तिन्ही आरोपींची जेलमध्ये मैत्री झाली
राहुल पंडित, सागर शिंदे आणि अमन खान या तिघांची मैत्री जेलमध्ये झाली होती. जेलमधून सुटल्यानंतर हे तिघे पुन्हा एकत्र भेटले. चोरी करण्याचा प्लॅन आखला. ही चोरी करण्यासाठी राहुल पंडित याने नेरूळ येथून एक रिक्षा देखील चोरी केली. हे तिघे सराईत गुन्हेगार असून, या तिघांविरोधात कोळसेवाडी पोलीस, महात्मा फुले पोलीस, उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस स्टेशन, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, भिवंडीमधील नारपोली पोलीस स्टेशन आणि भिवंडी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.