भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटले, सांस्कृतिक शहरात चाललंय काय?
तंबाखू व्यापारी नेहमीप्रमाणे बँकेत पैसे भरण्यासाठी चालले होते. यावेळी रस्त्यातच दोन दुचाकीस्वारांनी त्यांना अडवले. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुणे / अभितीत पोते : भरदिवसा कोयतचा धाक दाखवून तब्बल 47 लाख रुपये लुटल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत दिवसाढवळ्या ही घटना घडली. नाना पेठेतील आझाद आळीमधून टू व्हीलरवरून आलेल्या दोघांनी कोयता दाखवून पैशाने भरलेली पिशवी पळवली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा लूट प्रकरणी दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळी तपास सुरु आहे.
बँकेत पैसे जमा करण्यासाठी चालले असता लुटले
मिळालेल्या माहितीनुसार, तंबाखूचे एक व्यापारी नेहमीप्रमाणे बँकेत पैसे जमा करण्यासाठी दुचाकीवरुन चालले होते. यावेळी नाना पेठ येथील आजाद आळीमधून बाहेर येताच दोन तरुणांनी दुचाकीवरून येऊन या व्यापाऱ्याला अडवले. गाडीवरून उतरून त्या दोन तरुणांनी व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील पैशाने भरलेली पिशवी घेऊन दोघेही पसार झाले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.