आईवर प्रचंड जीव… मृत्यूनंतरही वर्षभर बॉडी घरातच ठेवली, नातेवाईकांशी संबंध तोडले अन्… कशी झाली पोलखोल
उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुटुंबीय, शेजारी पाजारी आणि समाजातील सर्वांशी संबंध तोडून दोन सख्ख्या बहिणी घरात रहात होत्या. धक्कादायाक गोष्ट म्हणजे गेल्या वर्षभरापासून त्या त्यांच्या आईचा मृतदेह घरात ठेवूनच वावरत होत्या
वाराणसी | 30 नोव्हेंबर 2023 : उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुटुंबीय, शेजारी पाजारी आणि समाजातील सर्वांशी संबंध तोडून दोन सख्ख्या बहिणी घरात रहात होत्या. धक्कादायाक गोष्ट म्हणजे गेल्या वर्षभरापासून त्या त्यांच्या आईचा मृतदेह घरात ठेवूनच वावरत होत्या. 27 वर्षांची पल्लवी आणि 19 वर्षांची वैष्णवी यांची आई उषा तिवारी यांचे 8 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले. मात्र आपण आईचे अंत्यसंस्कार उरकून टाकल्याचे त्यांनी शेजाऱ्यांना आणि कुटुंबियांना सांगितले.
त्या दोन्ही बहिणी मृत आईचे दागिने आणि भांडी विकून आपला उदरनिर्वाह करत होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या घरात तशाच रहात होत्या, कोणासाठीच दरवाजा उघडत नव्हत्या. शेजारी आणि नातेवाईकांशी पूर्णपणे संबंध तोडले होते. वारंवार दरवाजा वाजवूनही कोणीच उघडत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला.
घरातील दृश्य पाहून अंगावर आला काटा
अखेर त्यांच्या शेजारी राहणारे रमेश सिंह यांनी मिर्जापूर येथे राहणाऱ्या त्या तरूणींच्या मावशीच्या पतीला, धर्मेंद्र त्रिपाठी फोन करून सर्व माहिती दिली. हे कळताच त्रिपाठी यांनी पोलिसांना कळवले आणि सर्वजण त्या तरूणींच्या घरी पोहोचले. पोलिसांचा फौजफाटाही तेथे होता. अधिकाऱ्यांना जबरदस्तीने घराचा दरवाजा उघडला आणि ते आत पोहोचले तर आतील दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला.
गोधडीत गुंडाळला होता आईचा मृतदेह
घरातील एका खोलीत गोधडीत उषा यांच्या मृतदेहाचा सांगाडा गुंडाळलेला आढळला. तर त्यांच्या दोन्ही मुली दुसऱ्या खोलीत बसल्या होत्या. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. हा मृत्यू नैसर्गिक आहे की हत्या झाली हे पोस्टमॉर्टमनंतरच समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. दोन्ही मुली वर्षभरापासून आईच्या मृतदेहासोबतच राहिल्याचे उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली.
पैशांअभावी केले नाहीत अंत्यसंस्कार
पोलिसांन याप्रकरणी मृत उषा तिवारी यांच्या दोन्ही मुली पल्लवी आणि वैष्णवी यांची कसून चौकशी केली. त्यांची मानसिक स्थिती नीट नसल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. यामुळेच त्यांनी तब्बल एक वर्ष आईचा मृतदेह घरातच लपवून ठेवला. मात्र आमच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने आईवर अंत्यसंस्कार करू शकलो नाही, असे दोन्ही बहिणींनी तपासात सांगितले.
मोठी बहीण आहे उच्चशिक्षित
मिळालेल्या माहितीनुसार, मृत उषा तिवारी या बलिया येथील रामकृष्ण पांडे यांची सर्वात मोठी मुलगी. सुमारे 30 वर्षांपूर्वी उषा यांचं लग्न देवेश्वर तिवारी यांच्याशी झालं. मात्र पतीसोबत मतभेद झाल्यानंतर उषा या पल्लवी आणि वैष्णवी या दोन्ही मुलींसह मदरवन येथे वडिलांच्या घरी राहू लागल्या. उषा यांची मोठी मुलगी पल्लवी हिने एम.कॉम केले आहे. तर वैष्णवीने हायस्कूल पूर्ण केल्यानंतर शिक्षण सोडले होते. बिहारमधील एसीसी सिमेंटमधून निवृत्त झाल्यानंतर रामकृष्ण यांनी त्यांच्या घराजवळ कॉस्मेटिकचे दुकान उघडले होते.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाला उषा यांचा मृत्यू
पण, उषा यांची मुलगी पल्लवी हिची वागणूक चांगली नसल्यामुळे रामकृष्ण दीड वर्षांपूर्वी सर्वात धाकटी मुलगी उपासना हिच्या घरी लखनऊमध्ये राहू लागले. पल्लवीने त्यांच्या दुकानाचा ताबा घेतला पण तिला काही ते चालवता आलं नाही. 8 डिसेंबर 2022 रोजी उषा यांचे निधन झाले. दोन महिन्यांपूर्वीच, मृत उषा यांचे वडील रामकृष्ण हे भेटायला आले होते, पण पल्लवीने काही त्यांना घरात येऊ दिले नाही.
अखेर परत जाण्यापूर्वी रामकृष्ण यांनी त्यांचा मोबाईल नंबर, शेजारी राहणाऱ्या रमेश सिंग यांना दिला होता. काहीह गरज लागली, तर संपर्क साधा असे सांगून ते परत गेले. त्यानंतर आता हा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. दोन्ही मुली वर्षभरापासून आईच्या मृतदेहासोबतच राहिल्याचे उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली.