Ulhasnagar Crime : मित्रासोबत बाहेर गेला पण थेट रुग्णालयातच पोहोचला.. त्याच्यासोबत नेमकं काय घडलं ?
मित्रासोबत बाहेर गेलेल्या एका तरूणाला दोन तरूणांनी बेदम मारहाण करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेला तो तरूण थेट रुग्णालयातच पोहोचला.
मयुरेश जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, उल्हासनगर | 27 ऑक्टोबर 2023 : उल्हासनगर शहरात गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. रोज गुन्ह्यांच्या गंभीर घटना कानावर येतच आहेत. शहर गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांमुळे (Ulhasnagar Crime) गाजतयं. कधी दुकानासमोर पार्क केलेल्या ट्रकमुळे झालेल्या वादातून दुकानदाराला मारहाण तर कधी महिलेच्या गळ्यातील चेन चोरल्याची घटना कानावर पडते. अवघ्या दोन दिवसांपूर्वी तर एका तरूण आणि तरूणीने क्षुल्लक कारणावरून रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. यामुळे शहरातील नागरिक धास्तावले असून जीव मुठीत धरून जगत आहेत.
हे सर्व कमी की काय, म्हणून आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्रासोबत बाहेर गेलेल्या एका तरूणाला दोन तरूणांनी बेदम मारहाण करून त्याच्यावर कोयत्याने जीवघेणा वार केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तो तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून कायदा सुव्यवसस्थेचं तीन तेरा वाजल्याचं पाहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया नागरीक व्यक्त करत आहेत.
मित्रासोबत बाहेर पडला तो थेट रुग्णालयातच पोहोचला
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प 2 मधील रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणारे मयूर सकट व मनोज पवार हे दोघे मित्र सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सार्वजनिक शौचालय परिसरातील मोकळ्या जागेत टॉयलेटसाठी गेले होते. मात्र तेवढ्यात तिथे दोन तरुण आले आणि त्यांनी किरकोळ कारणावरून त्या दोघांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर एका तरूणाने मनोज पवार याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
त्याला उपचारांसाठी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा मित्र मयूर याच्यावरही रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. मात्र हा हल्ला नेमका का झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन अज्ञात तरूणांविरोधात भांदवी कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत असून पोलीस दोन्ही आरोपींचा कसून शोध घेत आहे. मात्र गुन्ह्याच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून कायदा सुव्यवसस्थेचं तीन तेरा वाजल्याचं पाहायला मिळत आहे.