आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्याकडे कोट्यवधीचं घबाड, दहा वर्षात जमवली ‘एवढी’ बेहिशेबी मालमत्ता

| Updated on: Jun 29, 2023 | 4:03 PM

आयआरएस अधिकारी सचिन सावंत याच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. ईडीने सचिन सावंतच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत खुलासा केला आहे.

आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्याकडे कोट्यवधीचं घबाड, दहा वर्षात जमवली एवढी बेहिशेबी मालमत्ता
आयआरएस सचिन सावंत यांच्या अडचणीत वाढ
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : तब्बल 500 कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणातील सहभागाच्या आरोपामुळे वादात सापडलेले आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या अडचणीत नवी भर पडली आहे. सावंत यांनी वरिष्ठ अधिकारी पदाचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे उघडकीस आले आहे. सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असलेले सावंत यांची मालमत्ता 2011 साली 1 लाख 40 हजार रुपयांच्या घरात होती. ही मालमत्ता पुढच्या 10 वर्षांतच म्हणजे 2022 मध्ये कित्येक पटीने 2 कोटी 1 लाख इतकी झाली आहे. त्यामुळे सचिन सावंत हे चहूबाजूंनी गोत्यात सापडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही यंत्रणांनी सावंत यांच्या विरुद्ध कारवाईचा फास आवळला आहे.

सावंत यांचे आई-वडिल आणि पत्नीही आरोपी

सीबीआयने यापूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यात सावंत यांचे आईवडील आणि पत्नीलाही आरोपी बनवलं आहे. नवी मुंबई सानपाडा परिसरातील सी क्वीन हेरिटेज बिल्डिंगमध्ये सावंत यांनी सेव्हन हिल कन्स्ट्रोवल या कंपनीच्या नावे फ्लॅट खरेदी केला. ज्या कंपनीत सावंत यांचे वडील डायरेक्टर आहेत. सावंत यांचे वडील बाळासाहेब सावंत हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. 1 कोटी 25 लाखांच्या फ्लॅट खरेदीसाठी 1 कोटी 2 लाख रोख रक्कम वापरण्यात आली, जी बेकायदेशीर आहे असं ईडीने म्हटलंय.

सावंत यांच्याकडे 44 लाखांची बीएमडब्लू

बनावट कंपन्यांच्या माध्यमातून सचिन सावंत यांनी पैसे वळवल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. काही रक्कम ही या बनावट कंपनीच्या खात्यावर वळती करण्यात आली होती ज्या कंपनीचे डायरेक्टर सावंत यांचे वडील आहेत. शिवाय सावंत यांच्या बँक अकाऊंटमध्येही वेगवेगळ्या माध्यमातून पैसे आल्याचं उघडकीस आलंय.

हे सुद्धा वाचा

सावंत यांचे वडील डायरेक्टर असलेल्या सेव्हन हिल कन्ट्रोवेल कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय दादरच्या एका चाळीत असल्याचं आढळलं. या संबंधित कंपनीने फक्त एकच आयकर भरलाय, जो 2018-19 मध्ये भरल्याच समोर आलंय. आयकर भरण्यासाठी दिलेला मोबाईल नंबर सचिन सावंत यांचा आहे. सावंत वापरत असलेली 44 लाखांची BMW हीसुद्धा बेनामी प्रॉपर्टी असल्याचं समोर आलं आहे. ही BMW कार मनोज लुंकड या नावाने रजिस्टर्ड आहे.