Amar Singh Chamkila | प्रेग्नंट पत्नीसह झालेली गायक अमरसिंग चमकिलाची हत्या, 33 वर्षांनंतरही गूढ कायम
8 मार्च 1988 रोजी अमरसिंग, अमरजोत आणि बँडमधील सदस्य पंजाबच्या मेहसामपूरमध्ये परफॉर्म करण्यासाठी आले होते. ते आपल्या गाडीतून बाहेर उतरले, तितक्यात बाईकस्वारांच्या टोळीने त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला
चंदिगढ : प्रसिद्ध पंजाबी गायक, गीतकार, संगीतकार अमरसिंग चमकिला (Amar Singh Chamkila) याची हत्या जवळपास 33 वर्षांनंतरही एक गूढ बनून राहिले आहे. अत्यंत बेधडक आणि बंडखोर वृत्तीच्या चमकिलाची बाईकस्वार गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. 8 मार्च 1988 रोजी अमरसिंग चमकिला, त्याची पत्नी आणि बँडमधील दोन सदस्यांची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली होती. मृत्यूसमयी तो केवळ 27 वर्षांचा होता.
कोण होता अमरसिंग चमकिला
अमरसिंग चमकिला हा बंडखोर कवी म्हणून प्रसिद्ध होता. त्याचा जन्म लुधियानाजवळच्या डुगरी गावातला. आपल्या डोळ्यांना दिसेल, तसं गावाचं वर्णन तो कवितेत करायचा, तो विवाहबाह्य संबंधांविषयी लिहायचा, मद्यपानाबद्दल लिहायचा, अंमली पदार्थ, तरुणांच्या मनातील धुमसता राग, असं सगळं काही तो शब्दबद्ध करायचा. त्यामुळेच त्याचे जितके समर्थक होते, तितकेच विरोधकही.
हत्येच्या दिवशी काय घडलं
8 मार्च 1988 रोजी अमरसिंग, अमरजोत आणि बँडमधील सदस्य पंजाबच्या मेहसामपूरमध्ये परफॉर्म करण्यासाठी आले होते. दुपारी दोन वाजता ते आपल्या गाडीतून बाहेर पडले, तितक्यात बाईकस्वारांच्या टोळीने त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी अमरज्योत गरोदर होती. छातीत गोळी लागून ती बाळासह गतप्राण झाली. तर चार गोळ्या लागल्याने अमरसिंग चमकिलाचाही मृत्यू झाला होता. त्याचे साथीदार गील सुरजीत आणि ढोलकी वादक राजा यांनाही हल्ल्यात प्राण गमवावे लागले होते. मृत्यू झाला त्यावेळी अमरसिंगने लिहिलेली जवळपास 200 गाणी स्वरबद्ध होणे बाकी होती.
ही हत्या दहशतवाद्यांनी घडवून आणल्याची चर्चा होती. अमरसिंग चमकिलाच्या वाढत्या प्रभावामुळे काही सहगायकांनी त्याच्या हत्येचा कट रचला, असा काही जणांचा समज होता. त्यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलींवर नियंत्रण मिळवण्यासाठी संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.
हत्येची अनेक कारणं चर्चेत
खलिस्तानी समर्थकांकडून अमरसिंगला अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. क्रांतिकारी लेखनासोबतच त्याने परजातीतील तरुणीशी केलेला विवाह, हेसुद्धा विरोधकांच्या डोळ्यात खुपण्याचं एक कारण होतं. त्याची पत्नी अमरजोत कौर ही चमकिलापेक्षा वरच्या मानल्या जाणाऱ्या जातीतील असल्याचं म्हणतात. लग्नानंतर अमरजोत ही त्याच्याच बँडमध्ये त्याच्यासोबत परफॉर्म करायची. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी हे हत्याकांड घडवल्याचा अंदाजही वर्तवला गेला होता.
या हत्या प्रकरणात कधीच कोणाला अटक झाली नाही आणि इतक्या वर्षांनंतरही ही केस न उलगडलेलीच आहे. चौघांच्या हत्येचं कारणही एक गूढच बनून राहिलं आहे.
संबंधित बातम्या :
बेपत्ता मुलीच्या चिंतेने ज्या बेडवर घालवली रात्र, त्यातच सापडला होता डोंबिवलीच्या स्नेहलचा मृतदेह