कर्माचं फळ एवढं इन्स्टंट? हा ठग आणि तो तर महाठग, निमित्त भगवान महावीर यांच्या मूर्तीचं..
पितळेची मूर्ती सोन्याची आहे सांगून विकली, घेणाराही अवलिया निघाला! कसा? वाचा
उत्तर प्रदेश : फसवणुकीचा एक अजब प्रकार बिजनौरमध्ये घडला. चार जणांनी पितळेची मूर्ती सोन्याची आहे, असं सांगून विकली. याच्या बदल्यात तब्बल 15 लाखांपेक्षाही जास्त रुपये घेतले. पण जेव्हा ही रक्कम घेऊन ते वाटेनं जात होते, तेव्हा त्यांना पोलिसांनी पकडलं. एवढी कॅश आली कुठून? असा प्रश्न पोलिसांनी विचारल्यावर सगळेच गोंधळले. पण खरी गंमत तर पुढे घडली. मूर्ती विकल्याचे लाखो रुपये घेऊन जात असलेल्या चार जणांकडे असलेली 15 लाखांची कॅशही चक्क खोटी असल्याचं समोर आलं. मूर्तीची विक्री करणारे ठग हे मूर्ती खरेदी करुन पैसे देणाऱ्या महाठगांपेक्षा भोळे असल्याचं या प्रकरणातून समोर आलंय. नेमका हा सगळा प्रकार उघडकीस कसा आला? कुणामुळे आला? ते सविस्तर जाणून घेऊयात.
बिजनौर पोलिसांनी वॅगनार कारमधून जाणाऱ्या चौघांना अडवलं. त्यांची तपासणी केली. या चौघांकडे तब्बल 15 लाख 86 हजार 150 रुपयांची कॅश सापडली. एवढी कॅश कुठून आली, असा प्रश्न पोलिसांनी केली. तेव्हा चोघांचीही वेगवेगळी उत्तर ऐकून पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी आपल्या स्टाईलने चौघांना पुन्हा विचारणा केली. पोलिसांच्या धाकाला घाबरुन अखेर एवढी कॅश कुठून आली, हे अखेर समोर आलं. या चार जणांच्या गँगने भगवान महावीर यांची मूर्ती विकली होती.
भगवान महावीर यांची पितळेपासून बनवलेल्या मूर्तीला सोन्याचा लेप लावण्यात आला होता. सोन्याचा लेप लावलेली ही मूर्ती सोन्याचीच आहे, असं सांगून चौघांनी ही मूर्ती विकून पैसे घेतले. थोडे थोडके नव्हे तर तब्बल 15.86 लाख घसघशीत रक्कम त्यांनी मूर्ती विकून कमावली होती.
मूर्ती विकून एकाला चांगलंच गंडवलं, या कॉन्फिडन्समध्ये चौघेही जण कॅश घेऊन निघाले. पण त्यांना आपणं गंडवले गेलो आहोत, याची पुसटशीही कल्पना नव्हती. पोलिसांनी भगवान महावीर यांची मूर्ती पितळेची असल्याचं मूर्ती खरेदी केलेल्या व्यक्तीला सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी जी माहिती मिळाली, ती आणखीनच धक्कादायक होती.
मूर्ती खरेदी केलेल्या व्यक्ती आपण मूर्तीच्या बदल्यात खोट्या नोटाच दिल्याचं सांगितलं. फक्त 1400 रुपयांच्या नोटा खऱ्या असून उरलेल्या सगळ्या नोटा खोट्या आहेत, असं समोर आलं. त्यानंतर मूर्ती विकणाऱ्या ठगांसमोर मूर्ती खरेदी करणारा महाठग निघाला, हे पोलिसांच्याही लक्षात आलं.
भगवान महावीर यांची ही मूर्ती चार किलो वजनाची होती. ही मूर्ती नाजिम आणि युनूस यांना विकण्यात आली होती. पण त्यांनी मूर्तीची विक्री करणाऱ्यांनाच खोट्या नोटा देऊन फसवलं होतं.
हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेश येथील जनदरपूर येथे उघडकीस आला. मूर्ती विक्रीच्या या फसवणुकीप्रकरणी एकूण पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर चौघांना अटक केली आहे. कलम 420/489 अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय.