बसमधील प्रवासी झोपेत असताना भरधाव ट्रक काळ बनून आला! 6 ठार
झोपेत असलेल्या प्रवाशांना काही कळेल याआधी अनर्थ घडला! पहाटे 4 वाजता भीषण अपघात
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश राज्यातील बहराईचमध्ये (Bahraich) एक भीषण दुर्घटना (Accident News) घडली. एक भरधाव ट्रक रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रवासी बसला जोरात (UP Accident) धडकला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामध्ये बसमधील 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 जण गंभीररीत्या जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे एकच खळबळ माजली होती.
नेमका कुणाच्या चुकीमुळे हा अपघात घडला, याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. समोरा समोर झालेल्या या धडकेत बस आणि ट्रकचं जबर नुकसान झालं. बसचा या अपघातात चेंदामेंदा झाला होता.
काही प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात किती भयंकर होता, याचा थरारक किस्साही सांगितला आहे. सकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास बहुतांश प्रवासी झोपेत होते. त्यावेळी जरवर या भागात एक ट्रक चुकीच्या दिशेने थेट बसच्या समोर आला आणि जोरात आदळला.
ही धडक इतकी जबरदस्त होती की झोपेत असलेल्या प्रवाशांना काही कळायच्या आतच अनर्थ घडला. काहींचा तर झोपेच प्राण गेला. तर काही जण गंभीररीत्या जखमी झाले. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेच्या आवाजाने प्रवाशांची झोपच उडाली. सगळेच धास्तावले.
Bahraich, Uttar Pradesh | Six people died and 15 injured in a collision between a Roadways bus and a truck in Tappe Sipah, Bahraich, confirms SHO Rajesh Singh. The injured have been sent to a hospital. The cause of the accident is yet to be ascertained. Police present at the spot pic.twitter.com/A5MPOomd05
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 30, 2022
अपघातग्रस्त बस ही उत्तर प्रदेशच्या ईदगाह डेपोमधील असल्याची माहिती समोर आली आहे. ही बस लखनौहून बहराईच इथं जात होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
या अपघातातील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे. जखमींवर स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केलं. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरुन बाजूला केली आणि त्यानंतर या मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.