Aasaram | आसारामच्या आश्रमात मृतदेह सापडला, बेपत्ता अल्पवयीन मुलगी कारमध्ये मृतावस्थेत
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे असलेल्या आसारामच्या आश्रमात मुलीचा मृतदेह सापडला, त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे
लखनौ : तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या स्वयंघोषित गुरु आसारामच्या (Aasaram) आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मयत बालिका 13 ते 14 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime) गोंडा येथे असलेल्या आसारामच्या आश्रमात मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली ही मुलगी गेल्या तीन-चार दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा शोध सुरु असतानाच ती मृतावस्थेत आढळल्याने सर्वत्र संतापाची लाट उमटली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील नगर कोतवाली भागातील विमौर येथे ही घटना उघडकीस आली असून आसारामचा आश्रम या भागात आहे. संबंधित मुलगी पाच एप्रिलपासून बेपत्ता होती. चार दिवसांनी आश्रम परिसरातील कारमध्ये तिचा मृतदेह आढळला. गाडीतून दुर्गंधी येत असल्याने चौकीदाराने ती उघडून पाहिली, त्यावेळी बालिका त्या ठिकाणी मृतावस्थेत आढळली. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
आसारामच्या आश्रमात बालकांचा मृतदेह सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2008 मध्येही गुजरातमधील गुरुकुल या आसारामच्या आश्रमातून बेपत्ता झालेले दोन विद्यार्थी काही दिवसांनी साबरमती नदीच्या किनारी मृतावस्थेत आढळले होते. तर मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथेही आसारामच्या आश्रमात एक विद्यार्थी बाथरुममध्ये मृतावस्थेत सापडला होता.
बलात्कार प्रकरणात आसाराम अटकेत
सुरतमधील दोघी बहिणींनी आसाराम त्याचा मुलगा नारायण साई यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्रही दाखल केले होते. त्यानंतर आश्रमातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात 2013 मध्ये आसाराम दोषी आढळला होता. 2013 पासून आसाराम जोधपूरच्या तुरुंगात कैद आहे. 2018 मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
संबंधित बातम्या
गुजरातमधील आरोपी तब्बल 12 वर्षांपासून फरार, शेवटी सापडला नाशिकच्या आसाराम बापूंच्या आश्रमात !
Asaram Bapu Covid : आसाराम बापूला कारागृहात कोरोना, आयसीयूत दाखल
टांगावाला ते आसाराम ‘बापू’; वाचा 400 ‘आश्रमा’च्या साम्राज्याची कहाणी!