10 रुपयांचे समोसे उधार मागणं पडलं भलंतच महागात, दुकानदाराने थेट उकळतं तेलच…
समोसे उधार मागितल्यानंतर दुकानदाराने ते देण्यास नकार दिला. त्यानतर ग्राहक व दुकानदारामध्ये वाद सुरू झाला आणि तो चांगलाच पेटला. त्यानंतर संतापाच्या भरात दुकानदाराने जे केलं ते पाहून सर्वच हादरले. समोसे विकणारा हा दुकानदार अतिशय भांडकुदळ आहे. यापूर्वीही त्याने अनेक लोकांना मारहाण केल्याचे पीडित इसमाच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे
कानपूर | 3 ऑक्टोबर 2023 : समोसे खायला तर सर्वांनाच आवडतात. चटकदार तळलेले गरमागरम समोसे (Samosa) आणि आंबटगोड चटणीचा स्वाद जीभेवर बराच काळ रेंगाळत राहतो. मात्र याच समोश्यापायी एक धक्कादायक घटना घडली आहे. समोसे उधार मागणे हे एका ग्राहाकाच्या जीवावरच बेतले. दुकानात आलेल्या ग्राहकाने 10 रूपयांचे समोस उधार मागितल्याने दुकानदार भडकला. आणि त्याने कढईतल उकळतं तेलंच (crime news) त्याच्या अंगावर फेकलं.
या मुळे त्या इसमाची पाठ होरपळून तो गंभीर जखमी झाला. उद्दाम वर्तणूक करणाऱ्या या दुकानदाराविरोधात पीडित ग्राहकाच्या पित्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याला पोलिसांनी अटक (arrested by police) केली. तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या इसमावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूरच्या नौबस्ता पोलीस स्टेशन हद्दीतील मछरिया बुधपूर येथे घडली. गवंडी म्हणून काम करणाऱ्या रामस्वरूपने सांगितले की, शनिवारी संध्याकाळी त्याचा मुलगा आसू हा शेजारच्या दुकानात समोसे विकत घेण्यासाठी गेला होता. आसूकडे फक्त 10 रुपये होते ते दुकानदाराला देऊन त्याने आणि समोसे खरेदी केले. तेवढ्यात त्याच्या बहिणीचा फोन आला. तिनेही त्याला (आणखी) समोसे आणायला सांगितले. पैसे नसल्यामुळे आसूने दुकानदाराला 10 रुपयांचे समोसे उधार देण्यास सांगितले.
थेट उकळतं तेलच फेकलं
पण त्या दुकानदाराने आसूला उधारीवर समोसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने विकत घेतलेले समोसे त्याच्या दुकानात फेकून दिले. याच मुद्यावरून दोघांमध्येही वाद सुरू झाला आणि भांडण टोकाला गेलं. संतापाच्या भरात समोसे विकणाऱ्या त्या दुकानदाराने आसूवर कढईतील उकळते तेलच ओतले. गरम तेल अंगावर पडल्याने आसे वेदनेने किंचाळू लागला. गंभीर जखमी झालेल्या त्याला कानपूरच्या उर्साला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दुकानदाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
या सर्व घटनेनंतर आरोपी दुकानदाराने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण तिथे जमलेल्या इतर नागरिकांना त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. यामध्ये गंभीर जखमी झालेला पीडित आसू, याच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. समोसे विकणारा हा दुकानदार अतिशय भांडकुदळ आहे. यापूर्वीही त्याने अनेक लोकांना मारहाण केल्याचे पीडित इसमाच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे