मुलीला वडिलांसमोर किडनॅप केलं, पण किडनॅप झाल्यावर मुलीच्या उत्तराने वडिलांनाच धक्का
तेलंगणातील राजन्ना सिरिसिला जिल्ह्यात राहणारी पीडित मुलगी रोज आपल्या वडिलांसोबत मंदिरात जायची. नेहमीप्रमाणे आजही तरुणी वडिलांसोबत मंदिरात चालली होती. यावेळी काही तरुणांनी तिचा पाठलाग केला.
हैदराबाद : तेलंगणातील हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पित्यासमोरच त्याच्या तरुण मुलीचे अपहरण करण्यात आले. या घटनेनंतर चांगलीच खळबळ माजली. पोलीस यंत्रणाही अॅक्शन मोडमध्ये आली. पोलिसांनी सर्वत्र तरुणीचा शोध सुरु केला. यानंतर या घटनेत मोठा ट्विस्ट आला आहे. पीडितेने एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये पीडिता आपण अपहरणकर्त्याशी विवाह केल्याचे सांगत आहे. मात्र पोलीस अपहरणकर्त्यांचा कसून शोध घेत आहेत.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडिओमध्ये पीडितेने अपहरणकर्त्याशी विवाह केल्याचा दावा केला आहे. पीडिताने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की आम्ही एक वर्षापूर्वीच विवाह केला आहे. मात्र तेव्हा अल्पवयीन असल्याने माझ्या आई-वडिलांनी हा विवाह मान्य केला नाही.
नातेवाईकांनी माझ्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला. आता आम्ही सज्ञान झालो आहोत, त्यामुळे आम्ही विवाह केला आहे. माझा पती दलित असल्याने माझे नातेवाईक विरोध करत असल्याचे तिने पुढे म्हटले आहे.
नेहमीप्रमाणे वडिलांसोबत मंदिरात चालली होती मुलगी
तेलंगणातील राजन्ना सिरिसिला जिल्ह्यात राहणारी पीडित मुलगी रोज आपल्या वडिलांसोबत मंदिरात जायची. नेहमीप्रमाणे आजही तरुणी वडिलांसोबत मंदिरात चालली होती. यावेळी काही तरुणांनी तिचा पाठलाग केला. तरुणीने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. आरोपींनी तिला कारमध्ये बसवून पळवून नेले.
यानंतर पीडितेच्या वडिलांनी कारचा पाठलागही केला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध सुरु केला. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.