व्हॉट्सअपवर महिलांना अश्लील मॅसेज पाठवणे महागात पडले, वासनांध इस्त्रीवाल्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
महिलांना व्हॉट्सअपवर अश्लील मॅसेज पाठवणाऱ्या आरोपीला विरार पोलिसांनी डोंबिवलीत बेड्या ठोकल्या. एका तरुणीच्या तक्रारीनंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आणि 24 तासाच्या आत आरोपीला अटक केली.
विरार / विजय गायकवाड : कपडे इस्त्रीसाठी आलेल्या महिलांचे नंबर घेऊन मग व्हॉट्सअपवर अश्लील मॅसेज टाकून महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या वासनांध इस्त्री चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. विरार पोलिसांनी आरोपीला डोंबिवलीमधून अटक केली आहे. या आरोपी विरोधात विरार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सोनू कानोजिया असे अटक केलेल्या 35 वर्षीय वासनांध आरोपीचे नाव आहे.
तरुणीच्या तक्रारीनंतर सर्व प्रकार उघडकीस
विरार पूर्व परिसरातील एका तरुणीच्या मोबाईलवर याने मिसकॉल केला होता. त्यानंतर हा फोन मुलीचा असल्याचे लक्षात आल्यावर त्याने तिला त्याच व्हॉटसअपवर अश्लील मॅसेज टाकण्यास सुरवात केली. आलेले मॅसेज तिने तात्काळ आपल्या वडिलांना दाखविले असता, वडिलांनी त्याला मॅसेजवरून रिप्लाय दिला. यानंतरही त्यांनाही त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करून, मला कोणीही पकडू शकत नाही अशा धमक्या दिल्या. पीडित मुलीच्या वडिलांनी विरार पोलीस ठाण्यात काल रात्री तक्रार दाखल केली होती.
विरार पोलिसांनी 24 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी या घटनेची तात्काळ गंभीर दखल घेत गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना केले. अवघ्या 24 तासात आरोपीला डोंबिवली परिसरातून अटक करण्यात यश आले आहे. आरोपी हा एका इस्त्रीच्या दुकानात कामाला आहे. हा मूळचा यूपीचा असून त्याची पत्नी आणि मुलं गावी असतात. हा एकटाच इस्त्रीच्या दुकानात काम करून तिथेच राहत होता.
महिलांना अश्लील मॅसेज पाठवायचा
या दुकानात इस्त्रीसाठी कपडे घेऊन येणाऱ्या महिलांचा मोबाईल नंबर घेऊन, त्या नंबरवर तो अश्लील मॅसेज पाठवायचा. अनेक महिलांना त्याने असे मॅसेज केले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे कोणत्याही गृहिणी महिलांनी आपला नंबर देताना सावध राहा, जर चुकीचा मॅसेज आला तर कुणाला रिप्लाय देऊ नका. अश्लील वर्तन करणारे कोणी असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा असे अहवान ही विरार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.