Satish Wagh Murder : मुलाच्या मित्राशी सूत जुळलं, भाड्याच्या खोलीत भलतंच घडलं… सतीश वाघ हत्या प्रकरणात मामीचं खतरनाक प्लानिंग
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामा सतीश वाघ यांच्या हत्येच्या प्रकरणात वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक करण्यात आली आहे. मोहिनी आणि तिच्या प्रियकराने सतीश वाघ यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली होती. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे.
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येच्या मागे त्यांची मामीच असल्याचं उघड झालं आहे. मामीच्या खतरनाक प्लानिंगमुळे सतीश वाघ यांचा काटा काढला गेल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी काल सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिला अटक केली. त्यानंतर तिची चौकशी केली असता तिनेच नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालं आहे. सुरुवातीला आर्थिक संबंधातून ही हत्या झाल्याचं सांगितलं जात होतं. पण ही हत्या आर्थिक कारणातून नसून अनैतिक संबंधातून झाल्याचंही उघड झाल्याने सर्वच हादरले आहेत.
सतीश वाघ प्रकरणी काल मोहिनी वाघला अटक केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी याबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मोहिनी वाघ यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अक्षय आणि मोहिनी यांनीच सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला होता. तर इतर चौघेही या हत्येत सामील झाले होते, असं शैलेश बलकवडे यांनी सांगितलं.
15 दिवस आधीच कट रचला
अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांचे प्रेमसंबध होते. त्यामुळे सतीश वाघ यांच्याकडून मोहिनी वाघ हिला सातत्याने मारहाण होत होती. सतीश वाघ दारूच्या नशेत मोहिनीला मारायचे. तसेच मोहिनीला पैशांचे सगळे व्यवहार आपल्या हाती घ्यायचे होते. त्यामुळेच ही हत्या करण्यात आली. मोहिनीने सतीश वाघ यांचा काटा काढण्यासाठी एकूण पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. हत्येच्या 15 दिवस आधीच कट रचला होता, असं पोलिसांनी सांगितलं.
भाड्याच्या खोलीत सूत जमलं
मोहिनी ही 48 वर्षाची आहे. तर अक्षय जावळकर हा 32 वर्षाचा आहे. अक्षय हा मोहिनीच्या मुलाचा मित्र आहे. अक्षय हा पूर्वी वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता. तिथेच त्याचे मोहिनीशी प्रेम संबंध जुळले. सतीश वाघ यांना या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले. सतीश यांच्याकडून मोहिनीला मारहाण होत होती. त्यामुळे मोहिनी प्रचंड वैतागली होती. त्यामुळेच सतीश हे आपल्या प्रेमसंबंधात अडसर होत असल्याने मोहिनी आणि अक्षयने त्यांचा काटा काढायचा ठरवलं. त्यानुसार दोघांनी खतरनाक प्लानिंग आखलं आणि सतीश यांचं अपहरण करून त्यांची हत्या घडवून आणल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.