विना हेल्मेट स्कूटर चालवत होता पती, ट्रॅफिक चलान पाहून पत्नीने थेट घटस्फोटच मागितला, नेमकं कारण काय?
पत्नी विना हेल्मेट स्कूटर चालवत होता. सिग्नलवरील स्पीड कॅमेऱ्यात पती कैद झाला. यानंतर विना हेल्मेट दुचाकी चालवली म्हणून वाहतूक शाखेने त्याला चलन पाठवले.
तिरुवनंतपुरम : केरळमधील तिरुवनंतपुरममधून एक रंजक घटना समोर आली आहे. पतीचे चोरीछुपे दुसऱ्या तरुणीसोबत विवाहबाह्य प्रेमप्रकरण सुरु होते. पण सिग्नवरील कॅमेऱ्यात चोरी कैद झाली अन् प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत गेले. सिग्नलवर बसवण्यात आलेल्या स्पीड कॅमेऱ्यामुळे पतीची चोरी उघड झाली. यानंतर पतीला दुसऱ्या तरुणीसोबत पाहून पत्नीला संताप अनावर झाला. तिने याबाबत पतीला जाब विचारला असता दोघांमध्ये जोरदार वाद झाला. विना हेल्मेट प्रवास केल्याप्रकरणी वाहतूक शाखेने घरी फोटोसह चलन पाठवले अन् पतीचा भांडाफोड झाला.
काय आहे प्रकरण?
केरळच्या वाहतूक नियंत्रण कक्षाने एका व्यक्तीच्या घरी चलन पाठवले. चलनसोबत सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपलेला फोटोही पाठवला. पती जी स्कूटर चालवत होता, ती त्याच्या पत्नीच्या नावावर होती, त्यामुळे हे चलन थेट त्याच्या पत्नीच्या खात्यावर पाठवण्यात आले. जेव्हा पत्नीला चलनची माहिती मिळाली तेव्हा ती फोटो पाहून आश्चर्यचकित झाली. फोटोमध्ये तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत हेल्मेटशिवाय स्कूटर चालवत होता. दोघेही हेल्मेटशिवाय स्कूटर चालवत असल्याच्या कारणास्तव चलन काढण्यात आले होते.
महिलेने पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला
फोटो पाहून पत्नी संतापली आणि पतीला जाब विचारू लागली. पतीने पत्नीला सांगितले की, स्कूटरवर बसलेली महिला प्रवासी असून तो तिला फक्त लिफ्ट देत होता. यानंतर पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यानंतर पतीने आपल्याला आणि मुलांना मारहाण केल्याचा आरोपही पत्नीने केला आहे. यानंतर पत्नीने करमाना पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली. पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत पतीला अटक केली आहे.