सीझर डिलिव्हरीनंतर महिलेचा मृत्यू, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत, काय घडलं नेमकं?
डोंबिवलीतील शास्त्रीनंगर रुग्णालयात पुन्हा एखदा हलगर्जीपणा झाल्याचे समोर आलं आहे. सीझरनंतर महिलेची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला.
डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरात केडीएमसीच्या हॉस्पिटलचा पुन्हा एकदा हलगर्जीपणा समोर आला आहे. आता पुन्हा एकदा पालिकेचे डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालय वादात सापडले आहे. एका महिलेचं सीझर या रुग्णालयात झालं. मात्र सीझरनंतर महिलेचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात नातेवाईकांनी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी नातेवाईकांचा जवाब नोंदवत एडीआर दाखल केला. पोलिसांनी जबाब नोंदवत तपास केला सुरु केला आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच सर्व स्पष्ट होईल.
सीझरनंतर दुसऱ्या दिवशी महिलेची तब्येत बिघडली
डोंबिवलीत राहणाऱ्या रिद्धी घाडी या 26 वर्षीय महिलेला पहिल्या बाळंतपणासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेला तपासून डॉक्टरांनी तातडीने सीझर करण्याचा सल्ला दिला. गुरुवारी सकाळी दहा वाजता रुग्णालयातील डॉक्टरांनी या महिलेची सीझरद्वारे यशस्वी प्रसुती केली. यानंतर तिला महिला विभागात डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले होते. मात्र शुक्रवारी संध्याकाळी अचानक रिद्धीच्या पाठीत दुखू लागल्याने डॉक्टरांना बोलवण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला इंजेक्शन दिले. यानंतर तिच्या नातेवाईकांना रक्त आणण्यास सांगण्यात आले.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
मात्र या दरम्यान रिद्धीची प्रकृती प्रचंड ढासळली. यामुळे तिला तातडीने डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता. रिद्धीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी तिचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी विरोधात जवाब नोंदवला आहे. सध्या विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणी एडीआर दाखल करत तपास सुरू केला आहे.
रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर दीपा शुक्ल यांना याबाबत विचारले असता त्यांनी नातेवाईकांचा आरोप फेटाळला आहे. प्रसुतीनंतर सदर महिलेची प्रकृती व्यवस्थित होती. तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. मात्र अचानक पाठदुखीच्या त्रासामुळे ती अत्यवसथत होत काही क्षणातच दगावली. तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजलेले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच ते स्पष्ट होऊ शकेल. मात्र डॉक्टरांच्या उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रिद्धीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.