कर्ज फेडण्यासाठी सुशिक्षित तरुणाचा कारनामा पाहून हैराण व्हाल, अखेर ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात
डोक्यावर कर्ज झाले होते. कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असताना त्याला नको ती युक्ती सुचली. मग या युक्तीमुळे तो थेट तुरुंगात गेला.
कल्याण : डोक्यावर खूप कर्ज झाले होते. ते कसे फेडायचे या विवंचनेत तरुण होता. मग त्याने दुकानातील ग्राहकांचे पैसे लुटण्यास सुरवात केली. मात्र मालकाला ही बाब लक्षात येताच मालकाने त्याला कामावरुन काढून टाकले. मग त्याने बनावट चावीच्या सहाय्याने दुकानाचे कुलूप उघडून गल्ल्यातील पैसे आणि मोबाईल चोरुन नेला. चोरीचा प्रकार घडल्यानंतर मालकाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी चोरट्याचा शोध घेतला असता सर्व प्रकार उघडकीस आला. हा चोरटा दुसरा तिसरा कुणी नसून, दुकानातील जुना कर्मचारी निघाला.विकास नाना बरबटे असे चोरट्याचे नाव असून, तो बीए पास आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
दुकानात चोरीची घटना घडली होती
डोंबिवली पूर्वेत नथिंग बट चिकन शॉपमध्ये 23 तारखेला अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या सहाय्याने बंद शॉपचे शटर उघडून दुकानातील मुद्देमाल चोरला. ड्रॉव्हरमधील 18 हजार रुपये रोख आणि 10 हजार रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल अशी एकूण 27 हजाराची चोरी केली. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुनिल कुराडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी डोंबिवली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणचे एपीआय योगेश सानप, पोलीस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, राठोड असे पाच जणांचा पथक नेमले. या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास करत असताना डोंबिवली रामनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले.
सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याला पकडले
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव विकास नाना बरबटे असल्याचे समोर आले. पोलिसांनी तरुणाला पोलिसी खाक्या दाखवत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कर्ज फेडण्यासाठी दुकानातील पैसे चोरायचा. मात्र दुकानमालकाला माहित होताच त्याला कामावरून काढून टाकले. म्हणून दुकानदाराचा बदला घेण्यासाठी बनावट चावीच्या आधारे दुकानाचे शटर उघडून त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेला 25 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.