महिलेच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडणं पडलं महागात, इतका चोपला की शेवटी नाल्यात…
सिगारेट ओढत असताना त्याचा धूर दुकानात बसलेल्या एका महिलेच्या तोंडावर सोडणं एका युवकाला फारच महागात पडलं. त्या महिलेने याचा विरोध केल्यावर वाद वाढला.

रायपूर | 25 डिसेंबर 2023 : सिगारेट ओढत असताना त्याचा धूर दुकानात बसलेल्या एका महिलेच्या तोंडावर सोडणं एका युवकाला फारच महागात पडलं. त्या महिलेने याचा विरोध केल्यावर वाद वाढला. त्यानंतर त्या युवकाला, त्या गल्लीतील 5 ते 6 तरूणांनी त्या युवकाला बेदम चोप देऊन त्याची हत्या केली. छत्तीसगडच्या बघेरा येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात ठेवण्यात आला. या घटनेत सहभागी असलेल्या सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बघेरा किल्ल्यात प्रेम उर्फ रॉकी या मुलाला काही लोकांनी बेदम मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मारहाण करणाऱ्या तरूणांनी त्याचा मृतदेह नाल्यात फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या हत्येची माहिती मिळताच एसएसपींनी एक टीम तयार करून ती घटनास्थळी रवाना झाली. बघेरा रोडलगतच्या नाल्यात तरुणाचा मृतदेह पडल्याचे पोलिसांना दिसले. मात्र त्याच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि छातीवर जखमेच्या खुणा होत्या. पोलिसांनी घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना दिली.
पोलिसांनी सांगितले की, बघेरा गावातील पप्पू किराणा स्टोअरजवळ आरोपी रघुनाथ मांडवी, भूपेश साहू, अविनाश उर्फ बौवा मांडवी, चंद्रकांत उर्फ चिंटू ठाकूर, आकाश मांडवी आणि एका अल्पवयीन आरोपीने सिगारेट ओढल्याबद्दल त्या तरूणाला काठीने मारहाण केली आणि त्याची हत्या केली. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी 3 पथके तयार केली. एफएसएलची टीमही घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. चौकशीनंतर पोलिसांनी घटनेत वापरलेल्या काठ्या जप्त केल्या. प्रेम मंडल असे मृत तरूाचे नाव असून तो पंचशील नगर दुर्ग येथील रहिवासी होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात तो आरोपी होता.
सिगारेट प्यायला घराबाहेर गेला तो परतलाच नाही
बघेरा येथे एक मृतदेह सापडला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली. मृत तरूण, प्रेम हा सिगारेट ओढण्यासाठी घराबाहेर पडला. दुकानातून सिगारेट विकत घेतल्यानंतर तो तेथेच सिगारेट पिऊ लागला आणि त्याचा (सिगारेटचा) धूर त्या महिलेच्या तोंडावर सोडला. मात्र त्या महिलेला हा प्रकार आवडला नाही, आणि तिने यावर आक्षेप घेतला. याच मुद्यावरून हळूहळू वाद सुरू झाला आणि पाहता-पाहता तो टोकाला गेला. महिलेच्या घरच्यांनी हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. पण प्रेम याने सरळ त्या महिलेलाच मारहाण करण्यास सुरूवात केली.
हे पाहताच त्या परिसरातील तरूण मध्ये पडले आणि त्यांनी मध्यस्थी करून प्रेमला माघारी पाठवले. मात्र थोड्या वेळाने प्रेम परत आला आणि शिवीगाळ करू लागला. मोहल्ल्यातील तरूणांशी त्याचा पुन्हा वाद सुरू झाला आणि तो टोकाला गेला. तेथील पाच-सहा तरुणांसोबत प्रेमने मारहाण करण्यास सुरूवात केली. आणि त्या तरूणांनीही प्रत्युत्तर दिले, त्यातच त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
