मित्राचा होता वाढदिवस, सेलिब्रेशनसाठी केले असे कृत्य… डायरेक्ट तुरुंगातच झाली रवानगी
तीन मित्रांपैकी एकाचा वाढदिवस होता, त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी इतर दोघांनी असा प्लान आखला, ज्यामुळे त्यांना थेट तुरूंगाचीच हवा खावी लागली.
इंदोर | 9 ऑगस्ट 2023 : यारों दोस्ती बडी ही हसनी है…. मित्रांनी , मित्रांसाठी रचलेली गाणी आणि त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी. मैत्रीचे अनेक किस्से आपण आत्तापर्यत ऐकले असतील पण इंदोर मध्ये काही तरूणांनी मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी (birthday celebration) असे कृत्य केले, ज्यामुळे तो वाढदिवस अनेक वर्ष त्यांच्या चांगलाच लक्षात राहील. त्यांच्या एका कृतीमुळे सर्वांना थेट तुरूंगाचीच (crime news) हवा खावी लागली.
इंदोरमध्ये चोरीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी काही तरूणांनी थेट एका व्यक्तीचा मोबाईलच लुटल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांपैकी दोन जणांना अटक केली असून तिसरा अद्याप फरार आहे. इंदूरमध्ये पोलीस आयुक्तालय यंत्रणा लागू झाल्यानंतरही विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
अशीच एक घटना इंदोरच्या कनाडिया ठाणे क्षेत्रातही काही दिवसांपूर्वी घडली. येथे राहणारे राम जाट हे काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते. मोबाईलवर बोलत बोलत ते चालत निघाले होते. तेवढ्यात तीन बदमाश तिथे बाईकवर आले, आणि त्यांच्या हातातील मोबाईल खेचून फरार झाले. राम जाट यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी मोबाइल लूटीचा गुन्हा दाखल केला आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज चेक करण्यास सुरूवात केली.
पोलिसांना कसे सापडले बदमाश ?
आपण मोबाईल चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते तेथून फरार झाले. पण ते त्यांची बाईक तेथेच सोडून गेले, अशी माहिती राम जाट यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी बाईकचा नंबर आणि सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने मोबाईल लुटणाऱ्या तिघांपैकी दोन आरोपींना अटक केली.देव आणि सुनील अशी त्यांची नावे असून त्यांचा मित्र, आणि या घटनेचील तिसरा आरोपी राजू याचा वाढदिवस होता, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी केली लूट
राजू बोरासी याचा वाढदिवस होता, त्याच्या सेलिब्रेशनसाठीच तिघांनी मोबाईल चोरला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे गुन्हेगारी रेकॉर्डही पोलिसांना मिळाले आहे. फरार असलेला तिसरा आरोपी राजू बोरासी याचा पोलीस शोध घेत आहेत. वाहन क्रमांक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना अटक केली, असे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपींनी लुटीचे इतरही काही गुन्हे केले आहेत का, याची माहिती उघड होऊ शकते, असे पोलिस म्हणाले.