गोंदियामध्ये 45 सेकंदांत 10 लाखांचे दागिने लंपास; चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
ऐन दिवाळीच्या तोंडावर शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेशनगर येथील सराफा दुकानात चोरीची खळबळजनक घटना घडली आहे. चोरांनी दुकानातून तब्बल दहा लाखांच्या (20 तोळे) सोने-चांदीच्या दागिन्यांची चोरी केली आहे.
गोंदिया : सध्या दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ग्राहकांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. आकर्षक दागिन्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहक सराफा दुकानात गर्दी करत आहेत. मात्र अशातच, ऐन दिवाळीच्या तोंडावर शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेशनगर येथील सराफा दुकानात चोरीची खळबळजनक घटना घडली आहे. चोरांनी दुकानातून तब्बल दहा लाखांच्या (20 तोळे) सोने-चांदीच्या दागिन्यांची चोरी केली आहे. चोरट्यांनी फक्त 45 सेकंदांत ही चोरी केल्यामुळे आश्चर्च व्यक्त होत आहे. चोरीचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदीया शहराच्या मध्यभागी असलेल्या गणेशनगरात दीपक सोनी यांचे आभूषण ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. दीपक सोनी आपल्या दुकानात येताना बॅगमध्ये सोने आणि चांदीचे दागिने घेऊन आले होते. त्यानंतर ही बॅग दुकानात ठेऊन ते लघूशंकेसाठी गेले. याच दरम्यान दोन चोरट्यांनी डाव साधत सोन्या चांदीच्या दागिन्यांची बॅग पळवली. दोन्ही चोरटे मोटारसायकलवर आले होते. दीपक सोनी बाहेर गेल्याचे कळताच अवघ्या 45 सेकंदांत या सराईत चोरांनी दागिन्यांची बॅग पळवली.
दरम्यान, चोरीचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चोरट्यांनी अवघ्या 45 सेकंदांत ही चोरी केल्यामुळे सगळेच अवाक् झाले आहेत. सराफा दुकानदाराने या चोरीबद्दल गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, भर दिवसा ही चोरी झाल्यामुळे शहरात सध्या भीतीचं वातावरण आहे.
संबंधित बातम्या :
क्षुल्लक कारणावरुन सासूची गळा आवळून हत्या, गोंदियातील धक्कादायक घटना
मौज-मजेसाठी महागड्या दुचाकींची चोरी, उल्हासनगरातील तिघे ताब्यात
फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील बाळाची चोरी; अवघ्या चार तासात चौघांना अटक