पब्जी गेम खेळू न दिल्याने छोट्या भावाने मोठ्या भावाचा खून केला
आईच्या मोबाईलवर पब्जी गेम खेळण्यास मनाई केल्याने 15 वर्षीय अल्पवयीन भावाने आपल्या 19 वर्षीय मोठ्या भावाच्या पोटात कैची खोपसून हत्या केली. ही घटना शनिवारी (29 जून) भिवंडी येथे घडली आहे.
ठाणे : आईच्या मोबाईलवर पब्जी गेम खेळण्यास मनाई केल्याने 15 वर्षीय अल्पवयीन भावाने आपल्या 19 वर्षीय मोठ्या भावाच्या पोटात कैची खोपसून हत्या केली. ही घटना शनिवारी (29 जून) भिवंडी येथे घडली आहे. मोहम्मद हुसैन मोहम्मद अच्छे शाह (19 ) असे मृत युवकाचे नाव आहे. अल्पवयीन हत्या करणाऱ्या युवकास शांतीनगर पोलिसांनी ताब्यात घेत त्याची रवानगी बाल सुधार गृहात केली आहे.
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौहान कॉलनी, मनपा शाळा क्रमांक 70 नजीकच्या चाळीत हे कुटुंबीय राहतात. शनिवारी सकाळच्या सुमारास 15 वर्षीय मोहम्मद फहाद आईचा मोबाईल घेऊन त्यावर ऑनलाईन पब्जी गेम खेळत होता. गेम खेळण्यासाठी मोठा भाऊ मोहम्मद हुसैन याने मनाई करत त्याच्या जवळील मोबाईल हिसकावून घेतला. यामुळे मनात राग ठेऊन अल्पवयीन छोटा भाऊ मोहम्मद फहाद मोठ्या भावासोबत भांडण करु लागला. यावेळी भांडण सुरु असतानाच मोहम्मद फहादने घरातील कैची घेऊन मोठ्या भावावर कैचीने सपासप वार केले. या घटनेत मोठा भाऊ गंभीर जखमी झाला. तातडीने शेजारच्या लोकांनी त्याला जखमी अवस्थेत स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा घटनास्थळी दाखल झाल्या. हत्या करणाऱ्या छोट्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले. 15 वर्षीय मोहम्मद फहाद याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याची रवानगी बाल सुधार गृहात केली आहे.