अकरावी ऑनलाईन प्रवेश सराव अर्ज भरण्यासाठी नवीन मुदत, 17 मेच्या तारखेत बदल
मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येतात
पुणे : अकरावी ऑनलाईन प्रवेशाला (Online Admission) पहिल्याच टप्प्यात दिरंगाई झाल्याचं पाहायला मिळत आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा सराव अर्ज 17 मेपासून भरण्यासाठीचे वेळापत्रक (11th Timetable) जाहीर करण्यात आले होते. मात्र आता तारखेत बदल करण्यात आला आहे. 23 मेपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता येईल. सुधारित वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्जाचा पहिला भाग, तर 20 जूननंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.
अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल
मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येतात. प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करुन संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र दहावीचा निकाल 20 जूनला जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेशासंदर्भात शाळा आणि मार्गदर्शन केंद्राचे उद्बोधन वर्ग घेण्यात आलेले आहेत. यापुढे आता यूट्यूब आणि फेसबुक लाईव्हद्वारे पालकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन देण्यात येणार आहे. यंदा प्रवेशाच्या नियमित तीन, तर एक विशेष फेरी राबवण्यात येईल. तर एफसीएफएस फेरीऐवजी प्रतीक्षा यादी लावण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याचा सराव करता यावा, म्हणून विद्यार्थ्यांना 23 मे पासून संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज कसा भरायचा, याबाबत सराव करता येणार आहे. प्रवेशासाठीचे कॉल सेंटरदेखील त्याच दिवशी सुरु करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांना कोणत्याही शंका किंवा अडचणी आल्यास कॉल सेंटरचा पर्याय उपलब्ध असेल.