मुंबई: नुकताच महाराष्ट्र बोर्डाच दहावीचा निकाल (Maharashtra Board SSC Results 2022) लागला आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरु झाली. यावर्षी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेशाचे अर्ज सुरु करण्यात आले आहेत. हे अर्ज भरण्याआधी मॉक अर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रवेश अर्जाचे एकूण दोन भाग आहेत. पहिला अर्ज विद्यार्थी निकालाच्या आधीच भरू शकत होते मात्र दुसऱ्या अर्जासाठी विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार होती. त्यानुसार महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल तर लागलेला आहे पण सीबीएसई, केंद्रीय बोर्डाचा दहावीचा (CBSE 10th Results 2022) निकाल अजून बाकी आहे. त्यामुळे हा निकाल लागल्यानंतरच अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा 11thadmission.org.in सुरु करण्यात येणार आहे. सध्या राज्यातील पाच महापालिका क्षेत्रातून अकरावी ऑनलाइन प्रवेशाची (11th Online Entrance Forms) नोंदणी सुरु असून राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून अर्जाचा भाग-1 भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे निकाल जुलै मध्ये लागण्याची शक्यता आहे. सीबीएसईच्या दहावी, बारावीचा निकाल या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रक्रियेत सीबीएसई पेक्षा आयसीएसईचे विद्यार्थी अधिक आहेत. गेल्या वर्षी ज्या महाविद्यालयांचे प्रवेश पूर्ण झाले होते त्यांना अकरावीचे वर्ग घेण्यास परवानगी मिळाली होती. मुंबई विभागात गेल्या वर्षी आयसीएसईचे आठ हजार तर सीबीएसईच्या पाच हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. जेव्हा केंद्रीय बोर्डाचा दहावीचा निकाल लागेल तेव्हा निकाल जाहीर झाल्यावर केंद्रीय बोर्डाचे विद्यार्थी 11thadmission.org.in या वेबसाईटवर नोंदणी करून अर्जाचा पहिला आणि दुसरा भाग भरू शकणार आहेत. अर्जाचा दुसरा भाग कॉलेजचे पसंतीक्रमांक भरण्यासाठी आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना देखील याचदरम्यान कॉलेज पसंती क्रमांक भरता येतील .
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दहावी आणि बारावीचा निकाल या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात बोर्डाकडून जाहीर केला जाऊ शकतो. सीबीएसई परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर करणार आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना सीबीएसई cbse.gov.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशपत्राची गरज भासणार आहे. प्रवेशपत्रात दिलेल्या रोल नंबर आणि जन्मतारखेच्या मदतीने ते आपला निकाल पाहू शकतील.