कॉलेजमध्ये प्रवेश घेताना या गोष्टींची काळजी घ्यावी, वाचा!
College admission: अनेकदा चुकीचे कॉलेज आणि चुकीचा अभ्यासक्रम निवडून विद्यार्थ्यांना आपले वर्ष वाया घालवावे लागते. अशा परिस्थितीत बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे काय अभ्यास करावा ? तो अभ्यास कुठे करावा? हे सगळे निर्णय विचार करून घ्यायला हवेत.
मुंबई: बोर्डाच्या परीक्षांची प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर आता कॉलेज प्रवेश फेरीला सुरुवात झाली आहे. अनेकदा चुकीचे कॉलेज आणि चुकीचा अभ्यासक्रम निवडून विद्यार्थ्यांना आपले वर्ष वाया घालवावे लागते. अशा परिस्थितीत बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे काय अभ्यास करावा ? तो अभ्यास कुठे करावा? हे सगळे निर्णय विचार करून घ्यायला हवेत. बारावी पाससाठी शेकडो डिप्लोमा, शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म कोर्सेस बाजारात उपलब्ध आहेत. कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी खालील पाच गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
प्रवेश घेताना या गोष्टी लक्षात ठेवा
- एखादी संस्था निवडण्यापूर्वी आपलं करिअर ठरवणं गरजेचं असतं. संस्थेतर्फे देण्यात येणारे कार्यक्रम, अभ्यासक्रम आणि संधींबद्दल जाणून घ्या. आपण ज्या क्षेत्रात करिअर करणार आहात त्या क्षेत्रात करिअर आहे का, बाजारात त्या क्षेत्रात मागणी आहे की नाही आणि आपण ते करण्यास तयार आहात की नाही हे लक्षात घ्या. खालील गोष्टी लक्षात घेऊन कॉलेजची निवड करा.
- कॉलेज किंवा विद्यापीठाचा इतिहास – अभ्यासक्रम निवडल्यानंतर आपण ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहात त्या कॉलेजमध्ये तो कोर्स किती काळ चालवला जात आहे हे जाणून घ्या. याशिवाय कॅम्पस प्लेसमेंटच्या सुविधांकडेही लक्ष द्यायला हवे.
- प्राध्यापकांचा अनुभव तपासण्याची खात्री करा – आपण संस्थेत प्रवेश घेत असलेल्या अभ्यासक्रमाला कोण शिकवत आहे हे तपासा. शिक्षक किंवा प्राध्यापकाची पात्रता आणि अनुभव लक्षात ठेवा. कुशल शिक्षक आपल्या शिकण्याच्या अनुभवात लक्षणीय वाढ करू शकतात.
- कॅम्पस प्लेसमेंट – प्लेसमेंट आणि इंटर्नशिपच्या बाबतीत संस्थेचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा. कॅम्पसमध्ये कोणत्या कंपन्या भरतीसाठी येतात आणि किती टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळते याचा शोध घ्या. विद्यार्थी आणि संस्था यांच्यातील संबंध तपासणे गरजेचे आहे.
- कॉलेज निवडीनंतर आपण ज्या कोर्समध्ये प्रवेश घेत आहात त्या कोर्समधील ट्यूशन फी किंवा कोर्सची पूर्ण फी तपासा. तसेच इतर संस्थांमध्ये एकाच अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणारे सर्व शुल्क तपासूनच प्रवेश घ्यावा.
- कॅम्पसला भेट द्या किंवा डेमो क्लास घ्या – आपण ज्या संस्थेत प्रवेश घेत आहात त्या संस्थेचे वातावरण कसे आहे हे जाणून घेण्यासाठी निवडलेल्या संस्थांच्या कॅम्पसला भेट द्या. शक्य असल्यास डेमो क्लासही घ्या. यामुळे तुम्हाला योग्य कॉलेजमध्ये प्रवेश घेणे सोपे जाईल.