दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही, झाल्या तर कशा; सर्वोच्च न्यायालयात होणार फैसला!
सध्या सर्वोच्च न्यायालयात दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांऐवजी ऑनलाईन परीक्षा घ्या किंवा परीक्षा न घेताच पर्यायी मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करा, अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी सुरूय. विशेष म्हणजे या रिट याचिकेत देशभरातील सर्व शिक्षण मंडळासह सीबीएसई, आयसीएसई आणि केंद्रीय बोर्डाच्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षाच रद्द करण्याची मागणी करण्यात आलीय.
नवी दिल्लीः देशभरातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे (Parents) लक्ष लागून राहिलेल्या दहावी-बारावी परीक्षा (Exams) होणार की नाही, झाल्या तर कशा होणार, या अतिशय कळीच्या प्रश्नाचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) घेणार आहे. सध्या न्यायालयात लेखी परीक्षांऐवजी ऑनलाईन परीक्षा घ्या किंवा परीक्षा न घेताच पर्यायी मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करा, अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी सुरूय. विशेष म्हणजे या रिट याचिकेत देशभरातील सर्व शिक्षण मंडळासह सीबीएसई, आयसीएसई आणि केंद्रीय बोर्डाच्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षाच रद्द करण्याची मागणी करण्यात आलीय. त्यामुळे न्यायालयात नेमका काय निर्णय देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नेमके प्रकरण काय?
इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. अनुभा सहाय यांनी ही याचिका दाखल केलीय. महाराष्ट्रासह 15 राज्यांतील विद्यार्थी आणि ओडिसा स्टुडंट युनियनने त्यांच्या मार्फत ही याचिका केलीय. याचिकेत म्हटले आहे की, कोरोनामुळे वर्षभर शाळा तशाच बंदच आहेत. काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळाले. मात्र, अनेकांना ते ही शिक्षण मिळाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आकलन, अभ्यास सारेच मागे पडले. हे पाहता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेऊ नयेत. त्यात एक तरी ऑनलाईन घ्यावात किंवा परीक्षा न घेताच पर्यायी पद्धतीने त्यांचे मूल्यमापन करण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
श्रेणी सुधारची मागणी
याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड प्रशांक पद्मनाभन बाजू मांडत आहेत. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेची संधी देण्याची मागणी केलीय. सर्व शिक्षण मंडळांनी वेळेत निकाल लावावेत. बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी युजीसीने वेळापत्रक तयार करावे. प्रवेशासंबंधी समिती स्थापन करण्यासाठी युजीसीला सूचना द्याव्यात, दहावी आणि बारावीसोबत अकरावीच्या विद्यार्थ्यांचीही लेखी परीक्षा घेऊ नये, अशी मागणी करण्यात आलीय. आता यावर सर्वोच्च न्यायलय काय निर्णय देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वेळापत्रक जाहीर
इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे. तत्पूर्वी निर्णय काय येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तूर्तास तरी महाराष्ट्रात ऑफलाईन परीक्षा घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!