Balbharati Pune: आधी मराठी शाळा,आता बालभारतीच्या पुस्तकांमध्ये घट! तुम्ही,आम्ही, ‘सरकारने’ दखल घ्यायची गरज
मागच्या वर्षी विक्रीसाठी 2 कोटी 63 लाख 31 हजार 500 पुस्तके छापण्यात आली होती पण या वर्षी केवळ 59 लाख 15 हजार पुस्तकांची छपाई झालीये. गेल्या काही दिवसात मराठी शाळांचा आणि शाळांमधील मराठी विद्यार्थ्यांचा टक्का घसरल्याने ही लक्षणीय घट दिसून येत आहे.

पुणे: बालभारतीच्या (Balbharati) पुस्तक छपाईमध्ये 50 टक्क्यांची घट झालीये. मुळातच मराठी शाळांचा (Marathi Schools) टक्का घटल्याने त्याचा मोठा परिणाम हा पुस्तक छपाईवर होतोय. इतकंच काय तर विद्यार्थ्यांना मोफत वाटप होणाऱ्या पुस्तकांची संख्या मागच्या वर्षीपेक्षा 8 लाख 99 हजाराने झाली कमी झाल्याची पाहायला मिळतंय. हे झालं पुस्तकांचं शैक्षणिक क्षेत्रातलं (Education Sector) वाटप पण खुल्या बाजारात सुद्धा विक्रीसाठी दिल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्येही घट झालीये. मागच्या वर्षी विक्रीसाठी 2 कोटी 63 लाख 31 हजार 500 पुस्तके छापण्यात आली होती पण या वर्षी केवळ 59 लाख 15 हजार पुस्तकांची छपाई झालीये. गेल्या काही दिवसात मराठी शाळांचा आणि शाळांमधील मराठी विद्यार्थ्यांचा टक्का घसरल्याने ही लक्षणीय घट दिसून येत आहे.
गांभीर्याने घ्यायची गरज!
महाराष्ट्रात नुसत्या मराठी शाळाच काय तर मराठी भाषा टिकवण्यासाठीचे सुद्धा अथक प्रयत्न चालू आहेत. मराठी शाळा या सरकारी अनुदानावर चालतात मगअशावेळी त्यांना नियमांचं काटेकोर पालन करावं लागतं. इंग्रजी शाळांची फी एवढी असते कि नुसत्या विद्यार्थ्यांच्या फी वर देखील शाळा चालू शकते. मराठी शाळा शिपायाची देखील स्वेच्छेने भरती करू शकत नाहीत. या उलट इंग्रजी शाळा शिपायापासून ते शिक्षकांपर्यंत सगळ्या पदांची भरती करू शकतात, मुळातच हे सर्व अधिकार स्वतः त्या संस्थेकडे असतात. अशी अनेक कारणं आहेत जी तज्ञ मंडळींकडून सांगितली जातात. मग लक्षात येतं की मराठी शाळांचा टक्का कमी का होत आहे.




मराठी शाळा टिकविण्यासाठी बरेच उपक्रम
मराठी शाळा टिकविण्यासाठी बरेच उपक्रम राबविले जातायत. मातृभाषेतलं शिक्षण काही ठिकाणी सक्तीचं केलं जातंय तर काही ठिकाणी शाळा कुठचीही असो, मराठी विषय सक्तीचा केला जातोय. मुंबईतील प्रत्येक शाळेचे नाव हे मराठीतून असावे यासाठी आता मुंबई महापालिकेच्या वतीने एक परिपत्रक देखील काढण्यात आले आहे. इतके प्रयत्न होत असून सुद्धा मराठी शाळांचा टक्का मात्र कमीच होत चाललाय. त्यात बालभारतीच्या पुस्तक छपाईमध्ये 50 टक्क्यांची घट झालीये ही धोक्याची घंटा आहे. सरकारने या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्यायला हवं!