RTE Entrance: पालकांनो शासनाच्या योजनेचा फायदा घ्या, लवकरात लवकर प्रवेश निश्चित करा !
गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. समाज माध्यमे तसंच शिबिराच्या माध्यामातून आरटीई प्रवेश प्रक्रिया नोंदणी कशाप्रकारे करायची याची देखील माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत मागील काही वर्षांपासून आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
ठाणे : बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क (Right To Education) कायद्याअंतर्गत वंचित, दुर्बल घटकातील मुलांसाठी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमध्ये 25 टक्के ऑनलाइन प्रवेश (Online Entrance) प्रक्रिया राबविण्यात येते. 2016-17 पासून ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा यादी (Waiting List) राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्हातील 2024 बालकांची निवड झाली आहे. निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी 27 मे 2022 पर्यंत पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर यांनी केलंय.
योजनेची मोठ्या प्रमाणात जनजागृती
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या योजनेची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. समाज माध्यमे तसंच शिबिराच्या माध्यामातून आरटीई प्रवेश प्रक्रिया नोंदणी कशाप्रकारे करायची याची देखील माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत मागील काही वर्षांपासून आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
विहित वेळेत बालकांचे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन
‘आरटीई’अंतर्गत ठाणे आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. या प्रवेश प्रक्रियेत यंदा नऊ हजार 86 शाळांमधील एक लाख एक हजार 906 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी दोन लाख 82 हजार 783 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सोडतीमध्ये 90 हजार 685 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. पुणे जिल्ह्यात प्रवेश जाहीर झालेल्या 14 हजार 958 मुलांपैकी 10 हजार 90 मुलांचे प्रवेश झाले आहेत. शासनाने दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करुन विहित वेळेत बालकांचे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी पालकांना केले आहे.