SPPU Pending Results: विद्यार्थ्यांची दैना! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा सुरु, आधीचे निकाल अजूनही प्रलंबित
विद्यार्थी संघटनांच्या म्हणण्यानुसार, विद्यापीठाने (University) लवकर निकाल लागतील, असे जाहीर करूनसुद्धा बहुतांश पदवी परीक्षांचे (Degree In SPPU) निकाल जाहीर झालेले नाहीत. कमीत कमी अंतिम वर्षाचे तरी निकाल येणे अपेक्षित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निकालास (SPPU Results) उशीर झाल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झालेत. विद्यापीठातील अंतिम सत्र परीक्षा 20 जूनपासून सुरू झालीये ही परीक्षा अजूनही सुरूच आहे. आधी झालेल्या परीक्षेचाही निकाल अद्याप विद्यार्थ्यांच्या हाती आलेला नाही त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झालेत. निकाल वेळेत न लागल्याने पुढील प्रवेशास विलंब, रोजगार संधी साठी विलंब अशा अनेक अडचणींचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागणार असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलंय. विद्यार्थी संघटनांच्या म्हणण्यानुसार, विद्यापीठाने (University) लवकर निकाल लागतील, असे जाहीर करूनसुद्धा बहुतांश पदवी परीक्षांचे (Degree In SPPU) निकाल जाहीर झालेले नाहीत. कमीत कमी अंतिम वर्षाचे तरी निकाल येणे अपेक्षित होते.
पंधरा ते वीस दिवसांत निकाल लावण्याचा प्रयत्न
यासंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, ‘यंदा पहिल्यांदाच दोन वर्षांनतर ऑफलाईन परीक्षा झाल्या आहेत. तरीदेखील अभियांत्रिकी, फार्मसी, ऑर्किटेक्चर आदी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. निकाल लागण्यासाठी किमान तीस दिवसांचा कालावधी लागतो. तरीदेखील पंधरा ते वीस दिवसांत निकाल लावण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी तब्बल 177 केंद्रांवर पेपर तपासणी सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत विधी अंतिम वर्षाचे निकाल जाहीर करण्यात येतील. तसेच, यापुढे जसजशा परीक्षा होतील तसतसे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.’ ‘कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी प्रवेशाच्या प्रथम, व्दितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांचे पेपर महाविद्यालयीन स्तरावरच तपासले जाणार आहेत. त्यामुळे निकाल लवकरात लवकर जाहीर केले जातील,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका
या दिरंगाईबद्दल कोणाला जबाबदार धरायचे? सध्या विद्यापीठात अनेक पदे प्रभारी असल्यामुळे निकालही अधांतरीच आहेत. परंतु या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यात अडचणी निर्माण होऊन त्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.