बच्चू कडू उमेदवार विधानसभा निवडणूक निकाल 2024
बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत. बच्चू कडू यांनी संभाजी छत्रपती आणि राजू शेट्टी यांच्याशी मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीने आपले उमेदवारही दिले आहेत. त्यामुळे या आघाडीचा काय निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय बच्चू कडू हे अचलपूरमध्ये पुन्हा एकदा चमत्कार घडवणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बच्चू कडू यांनी 1999 साली विधानसभेची पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. त्यावेळी त्यांचा 1300 मतांनी पराभव झाला होता. त्यांच्या पहिल्या निवडणुकीवेळी त्यांच्या अनेक मित्रांनी घरातील दागिने मोडले. पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले आणि निधी उभा केला. बच्चू कडू आजही या मित्रांचा अभिमानाने उल्लेख करतात.
2004 साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले. त्यानंतर सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. तीन वेळा आमदार असणाऱ्या बच्चू कडूंकडे आजही स्वःताचे घर नाही. ते आजही भाड्याच्या घरात ते राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. आमदारांच्या पगारवाढीला विरोध करणारे ते राज्यातील एकमेव आमदार आहेत.
आमदार झाल्यानंतर बच्चू कडू यांनी ‘प्रहार जनशक्ती पक्षा’ या संघटनेची स्थापना केली. अपंग, शेतकरी आणि गरिबांच्या न्याय हक्कासाठी झगडणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे. अपंगांच्या प्रत्येक प्रश्नावर ते अधिक आक्रमक होतात. अगदी अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत ते आक्रमक होऊन जातात.