Goa Assembly Election 2022 : आदित्य ठाकरे गोव्याच्या दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सभा घेणार; वचननामाही प्रसिद्ध करणार
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज गोव्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार आहेत. आदित्य ठाकरे उद्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. त्यानंतर ते गोव्यातील शिवसेनेच्या इतर उमेदवारांसाठीही प्रचार करणार आहेत. उद्याही आदित्य ठाकरे गोव्यात असतील.
पणजी: महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) हे आज गोव्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार आहेत. आदित्य ठाकरे उद्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (pramod sawant) यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. त्यानंतर ते गोव्यातील (Goa Assembly Election 2022) शिवसेनेच्या इतर उमेदवारांसाठीही प्रचार करणार आहेत. उद्याही आदित्य ठाकरे गोव्यात असतील. उद्या त्यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडी करून लढत असले तरी दोन्ही पक्षांचा जाहीरनामा वेगवेगळा प्रसिद्ध होणार आहे. गोव्यातील प्रत्येक मतदारसंघाचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळेच आम्ही वेगवेगळा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांच्या गोवा दौऱ्याचीही माहिती दिली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. आज आदित्य ठाकरे गोव्यात येणार आहेत. वास्कोत सभा घेतील. मग पेडण्यात जातील. त्यांच्या काही भेटीगाठी आहेत. उद्या मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ साखळीत त्यांची सभा आहे. म्हापसामध्ये सभा आहे. संपूर्ण गोव्यात आमचा प्रचार, प्रसार आणि विस्तार सुरू आहे. इतकच करून आम्ही थांबणार नाही. विधानसभा संपल्यावर गोव्यात लोकसभेची तयारी सुरू करत आहोत. गोव्यात लोकसभा लढणार. या क्षणी दोन जागा लढण्याची मानसिकता आहे. पण गोवा लढणार, असं राऊत म्हणाले. शिवसेना 11 जागा लढत आहे. पेडण्यापासून वास्कोपर्यंत दोन्ही बाजूला आमचे उमेदवार आहेत. ख्रिश्चन उमेदवार आहेत. हिंदू आणि मराठीही आहे. अख्खा गोवा आमचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
गोव्यात महाराष्ट्र पॅटर्न
राष्ट्रवादीचा स्वतंत्र जाहीरनामा येणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. दोन स्वतंत्र पक्ष आहेत. सीट अडजेस्टिंग वेगळं आहे. गोव्याचे प्रश्न मतदारसंघानुसार वेगळे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा जाहीरनामा येत असेल तर वावगं नाही. आमचा उद्या येईल. आदित्य ठाकरेंच्या हस्ते या जाहीरनाम्याचं प्रकाशन होईल, असं त्यांनी सांगितलं. गोव्याच्या विधानसभेत आमचे आमदार असावेत हा आमचा प्रयत्न आहे. इकडच्या आघाडीत आम्ही असू. गोव्यातही आम्ही महाराष्ट्र पॅटर्न राबवू, असं त्यांनी सांगितलं.
गोव्याचा इतिहास गोवेकरांना माहीत आहे
आमची तयारी काय आहे हे आमचे विरोध सांगू शकतील. गोवा राज्य लहान असलं तरी देशातील पंतप्रधान त्यात लक्ष घालत आहेत. गोवेकरांना त्यांचा इतिहास सांगत आहेत. गोवेकरांना इतिहास माहीत आहे. विशेषत: शिवसेनेला गोव्याचा इतिहास अधिक माहीत आहे. कारण गोव्याच्या लढ्यात महाराष्ट्र होता. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा मूळ पक्ष राज्यकर्ता होता.
भाजपला 40 पैकी 42 जागा मिळो
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. भाजपला 22 जागा जिंकू द्या. फडणवीस नेते आहेत. नेत्याला असं बोलावं लागतं. आम्हीही बोलतो 11 पैकी 11 जागा जिंकू. काँग्रेस म्हणतंय आम्हाला संपूर्ण बहुमत मिळेल. आपही म्हणतंय पूर्ण बहुमत मिळेल. तृणमूलही म्हणत आहे. पंतप्रधानांच्या सभेने त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल तर चांगली गोष्ट आहे. पश्चिम बंगालमध्येही पंतप्रधानांच्या 20 सभा झाल्या होत्या. आम्ही पाहिल्या. केरळमध्येही सभा झाल्या होत्या. पंजाबलाही होत आहेत. पंतप्रधान जातात त्या राज्यात माहौल तयार होतो. पंतप्रधान राज्याला काही तरी देईल ही अपेक्षा असते. साधा मुख्यमंत्री गेला तरी लोकांच्या अपेक्षा वाढत असतात. त्यामुळेच त्यांना 22 काय 40 पैकी 42 जागा मिळो असं मी म्हणेल, असा चिमटा त्यांनी काढला.
संबंधित बातम्या:
आधी लडाखला चीनच्या तावडीतून स्वतंत्र करा, गोव्यावर नंतर बोलू; राऊतांचा पंतप्रधानांना टोला