उत्तरेत निवडणूक निकालात बंपर यश, महाराष्ट्रात काय होणार? फडणवीस म्हणाले तर आम्ही सरकार बनवू
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा (Goa), पंजाब आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपला निर्णायक आघाडी मिळालीय.
पणजी : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा (Goa), पंजाब आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपला निर्णायक आघाडी मिळालीय. तर, पंजाबमध्ये आपनं सत्ता मिळवलीय. गोव्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपनं विजय मिळवलाय. गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देण्यात आली होती. गोव्यातील विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रात (Maharashtra) आम्ही सरकार पाडणार नाही. आम्ही 2024 ची तयारी सुरु केली आहे. आम्ही त्या निवडणुकीनंतर पूर्ण बहुमतानं विजयी होऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तर, तोपर्यंत सध्याचं सरकार पडल्यास आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आम्ही 2024 ची तयारी केलीय
महाराष्ट्रात आम्ही 2024 ची तयारी केलीय. आम्ही सरकार पाडणार नाही. पण सरकार पडलं तर आम्ही पर्यायी सरकार देऊ,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की शिवसेनेची लढाई आमच्याशी नाही तर नोटाशी आहे. तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्रित मतं पाहिली तरी ती नोटापेक्षा कमी आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी मोठी सभा घेतली. तिथे त्यांच्या उमेदवाराला 97 मतं आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. काँग्रेसला आत्मचिंतन करायची गरज आहे. विशेषत: परिवारवादी पक्षांना हा मोठा संदेश आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विजयचाचे श्रेय गोव्यातील जनतेचं आणि नरेंद्र मोदींचं
गोव्यात जे काही निकाल येत आहेत. तिथे संपूर्ण बहुमताकडे आम्ही जात आहोत. याचं श्रेय गोव्यातील जनतेला आणि आमचे नेते नरेंद्र मोदी यांना आहे. गोव्यात डबल इंजिन सरकारने काम केलं. त्यामुळे गोव्यात मोठा विजय भाजपला मिळतोय. आम्हाला बहुमत मिळत असलं तरी काही अपक्षांना आम्ही सोबत घेणार आहोत. एमजीपीलाही आम्ही सोबत घेणार आहोत. अंतिम निर्णय त्यांना घ्यायचा आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची परवानगी घेऊन आम्ही दावा करु, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तर उत्पल पर्रिकर आमदार असते
बाबूश विजय होणार हे पहिल्या दिवशीच स्पष्ट होतं. त्याचा मला आनंद आहे. पण उत्पल पर्रिकर पराभूत झाल्याचा आनंद मी व्यक्त करत नाही. ते आमच्याच परिवारातील आहेत. त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर आज ते आमदार असते.
इतर बातम्या:
2024 मोदींना कसं रोखणार? शरद पवारांनी ‘राष्ट्रीय फॉर्म्युला’ पत्रकारांसमोर मांडला, कधी अंमल होणार?