Goa Assembly Election : उत्पल पर्रिकर पणजीतून अपक्ष लढणार, आता शिवसेना आपला उमेदवार माघारी घेणार?
उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. तत्पूर्वी गोवा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी उत्पल पर्रिकर जर पणजीतून अपक्ष लढण्यावर ठाम राहिले तर शिवसेना आपला उमेदवार मागे घेईल, असं खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) रणधुमाळीत मोठं वादळ उठलं आहे. भाजपनं पणजी विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानंतर दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. तत्पूर्वी गोवा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी उत्पल पर्रिकर जर पणजीतून अपक्ष लढण्यावर ठाम राहिले तर शिवसेना आपला उमेदवार मागे घेईल, असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं. सुभाषजी वेंलिगकर यांनी अनेक वर्षे आमच्यासोबत विविध माध्यमांतून काम केलं आहे, त्यांचे चिरंजीव शैलेंद्र वेलिंगकर यांना गोव्याच्या उप राज्य प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. तसेच त्यांची उमेदवारी गोव्यातून जाहीर करण्यात आली. “जर का उत्पल पर्रिकर स्वतंत्र निवडणुक लढविणार असतील, तसेच ते शेवटपर्यंत आपला अर्ज काय ठेवणार असतील, तर आम्ही तिथली उमेदवारी मागे घेऊ, असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
राष्ट्रवादीही पाठिंबा देणार?
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही उत्पल पर्रिकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. तसंच ते उपक्ष उभे राहिले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांना पाठिंबा असेल असं आव्हाड म्हणाले होते. ‘पर्रीकर यांच्याविषयी त्यांच्या मतदार संघात असलेली सहानुभूती ती काहीही बोललात तरीही नाकारता येणार नाही. उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिले तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. मी येत्या एक दोन दिवसात त्यांना भेटून आमंत्रणही देईन की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, असं वक्तव्य आव्हाड यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलं होतं.
उत्पल पर्रिकरांची अपक्ष लढण्याची घोषणा
‘मतदारांनी केवळ मनोहर पर्रिकरांना मतदान दिलं होतं. कारण पर्रिकर हे मूल्यांच्या बाजूने होते. त्यामुळे मी या मुद्द्यांच्या बाजूने आहे. माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मलाही पणजीत मजबूत करायचा आहे. मला पणजीतून उमेदवारी दिली नाही. केवळ संधी साधुला तिकीट दिलं आहे. दोन वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना तिकीट दिलं. त्यामुळे मी पणजीतून अपक्ष म्हणून लढणार आहे’, अशी मोठी घोषणा उत्पल पर्रीकर यांनी आज केलीय. ‘मी खूप मोठी रिस्क घेत आहे. मी फार कठीण मार्ग निवडला आहे. माझ्या करियरवर खूपजणांनी चिंता व्यक्त केली. माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये, गोव्याची जनता माझी चिंता करेल’, असंही उत्पल पर्रीकर म्हणाले.
इतर बातम्या :