गोवा भाजपमध्ये सुंदोपसुंदी; मुख्यमंत्री सावंतांविरोधात आमदार राणेंनी थोपटले दंड, प्रकरण काय?
गोव्यात नवनिर्वाचित आमदार विश्वजीत राणे यांनी थेट मुख्यमंत्री सावंताविरोधात पुन्हा दंड थोपटलेत. त्यांना चक्क उघड-उघड आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू केलेत. आता इतक्या दिवस भाजप विरुद्ध विरोधक असा रंगलेला सामना चक्क भाजप विरुद्ध भाजप असा रंगताना दिसतोय.
पणजीः विजयाचा निर्भेळ आनंद साजरा करता यायला हवा. मात्र, भाजपला (bjp)गोव्यात (Goa) सध्या तरी तेच जमत नसल्याचे दिसत आहे. येथे आपली सत्ता कायम राखण्यात पक्षाने यश मिळवले. 40 पैकी 20 जागांवर उमेदवार विजयी झाले. अपक्ष उमेदवारांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली. भाजपचा मुख्यमंत्री होण्याची वाट अतिशय सुकर झाली. या विजयाबद्दल विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीसांचे किती म्हणून कौतुक झाले. मात्र, आता मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना पक्षातून विरोध होताना दिसतोय. नवनिर्वाचित आमदार विश्वजीत राणे यांनी थेट मुख्यमंत्री सावंताविरोधात पुन्हा दंड थोपटलेत. त्यांना चक्क उघड-उघड आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू केलेत. आता इतक्या दिवस भाजप विरुद्ध विरोधक असा रंगलेला सामना चक्क भाजप विरुद्ध भाजप असा रंगताना दिसतोय. येणाऱ्या काळात खरेच मुख्यमंत्री सावंतच राहणार की, विरोध पाहता भाजप चेहरा बदलणार हे ही पाहावे लागेल.
नेमके प्रकरण काय?
गोव्यातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना नेता मानण्यास नकार दिलाय. विश्वजीत राणे कुटुंबीयांनी स्थानिक वृत्तपत्रात सलग दुसऱ्या दिवशी दिलेल्या जाहिरातीत डॉ प्रमोद सावंत यांना स्थान दिलेले नाही. त्यामुळे एकच चर्चा रंगलीय. वाळपाई विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे धन्यवाद मानण्यासाठी विश्वजीत राणे यांनी आज स्थानिक आघाडीच्या वृत्तपत्रांत पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, सी. टी. रवी आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची छायाचित्रे आहेत. मात्र, यातून फक्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र गायब आहे. विशेष म्हणजे विश्वजीत राणे यांची पत्नी डॉ. दिव्या राणे यांनी काल दिलेल्या जाहिरातीतही डॉ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र होते गायब.
मतभेद चव्हाट्यावर
विश्वजीत राणे यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक स्वतंत्रपणे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची राजभवनात भेट घेतली होती. यामुळेही गोव्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. राज्यपालांना आपल्या मतदार संघातील कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी भेटल्याचा खुलासा त्यावर विश्वजीत राणे यांनी केला. दुसरीकडे सत्तास्थापनेसाठी भाजपच्या केंद्रीय स्तरावरून राज्यातील नेत्यांना अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत, तसेच सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पाठिंबा घेण्याबाबतही भाजपामध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.
इतर बातम्याः
फडणवीस पुरून उरतील, ते किती तरी ठाकरे-पवार खिशात घालून फिरतात; निलेश राणेंचा हल्लाबोल